पंजाबमध्ये पोलीस ठाण्यावर खलिस्तानी समर्थकांचा हल्ला, ६ पोलीस जखमी

पंजाबमधील अमृतसर येथे आज 'वारिस पंजाब दे' या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याच्या समर्थकांनी  अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला केला.

पंजाबमधील अमृतसर येथे आज ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याच्या समर्थकांनी  अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सहा पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या आठवड्यात वारिस पंजाब दे या संघटनेच्या एका कार्यकरत्याला अटक करण्यात आली. तो निर्दोष असून पोलीस त्याचा जाणीवपूर्वक छळ करत असल्याचा आरोप सिंह याने केला आहे. तसेच त्याच्यावरील गुन्हा मागे न घेतल्यास पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा इशारा सिंह आणि त्याच्या समर्थकांनी दिला होता. त्यानुसार आज मोठ्या संख्येने सिंह यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला.

यावेळी सिंह यांचे समर्थक आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर हल्लेखोरांनी पोलीस ठाण्यात तोडफोड केली. यात ६ पोलीस जखमी झाले. याप्रकरणी अमृतसरचे एसएसपी यांनी सांगितले की अमृतपाल याने अटक करण्यात आलेल्या तुफान सिंह निर्दोष असल्याचे पुरावे दिले आहेत. यामुळे उद्या त्याला सोडण्यात येईल. तसेच याप्रकरणाच्या तपासणीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

जर हिंदू राष्ट्राची मागणी केली जाऊ शकते मग खलिस्तानची का नाही
दरम्यान,यावर बोलताना अमृतपाल सिंह याने सांगितले की आम्ही शांतिपूर्ण मार्गाने खलिस्तानची मागणी करत आहोत. जर लोक हिंदू राष्ट्राची मागणी करू शकतात तर मग आम्ही खलिस्तानची मागणी का करू शकत नाही.  दिवंगत पंतप्रधान इंदीरा गांधी यांनीही खलिस्तानला विरोध केला होता त्याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागली होती. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. मग ते पंतप्रधान मोदी असो किंवा अमित शाह नाहीतर भगवंत मान. भारत हा लोकशाहीचा देश आहे. आमच्या पूर्वजांनी देश वाचविण्यासाठी आपल्या प्राणाचा त्याग केलाय. आम्हीही आमच्या धर्मासाठी आणि समाजासाठी बलिदान देण्यास तयार आहोत. असेही सिंह याने म्हटले आहे.

अमृतपाल जरनैल सिंह भिंद्रावालेचा समर्थक आहे. त्याला खलिस्तानी समर्थक म्हणून ओळखले जाते. सप्टेंबर महिन्यात त्याला वारिस पंजाब दे या संघटनेचा प्रमुख बनवण्यात आले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमृतसरमध्ये शिवसेना टकसाली अध्यक्षाची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. त्यामागे अमृतपाल सिंहचा हात असल्याचे समोर आले होते.