पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाची घेतली शपथ

सतपाल महाराज आणि धन सिंह रावतसह ११ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली.

Pushkar Singh Dhami takes oath as Uttarakhand CM
पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाची घेतली शपथ

खाटीमा विधानसभा आमदार पुष्कर सिंह धामी यांनी आज, रविवारी उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. धामी उत्तराखंडचे ११वे मुख्यमंत्री बनले आहेत. देहरादून स्थित राजभवनवर राज्यपाल बेबी रानी मौर्य यांनी मुख्यमंत्री पदाची धामी यांच्याकडून शपथ घेतली. पुष्कर धामी यांच्या व्यतिरिक्त भाजपचे ज्येष्ठ नेते सतपाल महाराज, हरक सिंह रावत, बंशीधर भगत, यशपाल आर्य, बिशन सिंह सुफाल, सुबोध उनियाल, अरविंद पांडेय, गणेश जोशी, धन सिंह रावत, रेखा आर्य आणि यतीश्वरानंद यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.

उत्तराखंडमधील अनेक भाजपचे आमदार पुष्कर सिंह धामी यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी नाराज असल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सतपाल महाराज यांनी शपथविधीपूर्वी पुष्कर सिंह धामी यांची स्वतः जाऊन भेट घेतली. नाराज आमदारांची मनधरणी करण्याची जबाबदारी भाजपचे खासदार अजय भट्ट यांच्यावर सोपवली होती. अजय भट्ट अनेक आमदारांसोबत बोलले. तसेच त्यावेळी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री बीसी खंडूरीसह काही नेत्यांनी धामी यांची भेट घेतली. अजय भट्ट यासोबत भेट झाल्यानंतर बिशन सिंह चुफाल म्हणाले की, नाराज असल्याच्या बातम्या चुकीच्या आहे. दरम्यान मुख्यमंत्री शपथविधीच्या कार्यक्रमापूर्वी यशपाल आर्या यांच्या घरी एक बैठक झाली. यामध्ये बिशन सिंह चुफाल, धन सिंह, यतीश्वरानंद आणि महेंद्र भट्ट उपस्थित होते.

उत्तराखंडचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह यांनी पुष्कर सिंह धामी यांना शुभेच्छा दिल्या. तसेच ते म्हणाले की, काँग्रेसला राजकारणात संधी मिळत नाही. भाजपच्या आमदारांच्या नाराजीबाबत ते बोलले की, नव्या मुख्यमंत्र्यांची निवड झाली आहे आणि याबाबत भाजपचे नेतेच नाराज आहेत. जे मुख्यमंत्री आपल्या राजकीय पक्षाला संतुष्ट करू शकत नाही, त्यांच्या आमदारांचे समाधान करू शकत नाही, ते मुख्यमंत्री उत्तराखंडचा विकास काय करतील?


हेही वाचा – RSS चे निकटवर्तीय, दोनदा आमदार, पाहा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामींची कारकिर्द