नवी दिल्ली : दाक्षिणात्य अभिनेता सुपरस्टार अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. कारण, त्याचा बहुचर्चित ‘पुष्पा 2’ हा नुकताच देशभर प्रदर्शित झाला आहे. तसेच, बॉक्स ऑफिसवर तो तुफान कमाई करत आहे. असे असताना त्याला झालेली अटक ही त्याच्या चाहत्यांसाठी मोठी धक्कादायक बाब आहे. दरम्यान, याचा पुष्पा 2 च्या एका प्रीमियर दरम्यान अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली आणि त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, अल्लू अर्जुनला ही बातमी कळल्यानंतर त्याने मृत महिलेच्या कुटुंबाला 25 लाखांची मदत करणार असल्याचे सांगितले होते. (Pushpa 2 Actor South Indian Superstar Allu Arjun Arrested by Hyderabad Police)
नेमकं प्रकरण काय?
नुकताच दाक्षिणात्य अभिनेता आणि सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुचर्चित पुष्पा 2 हा देशभरात थाटामाटात प्रदर्शित करण्यात आला. यावेळी देशभरातील अनेक शहरांमध्ये पुष्पा 2 च्या प्रमोशनसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी तौबा गर्दी केली होती. दरम्यान, देशभरात हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी एक प्रीमियर 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील संध्या या चित्रपटगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका 35 वर्षीय महिला एम. रेवतीचा श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाला. तसेच, तिच्या नऊ वर्षांच्या मुलाची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणानंतर अभिनेता अल्लू अर्जुनविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती.
अभिनेता अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल केल्यानंतर त्याने तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी त्याने ही एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. 4 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर 5 डिसेंबरला अभिनेता अल्लू अर्जुन, त्याची चित्रपटाची संपूर्ण टीम आणि चित्रपट व्यवस्थापनाविरोधात चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा तिचा मुलगाही तिच्यासोबत होता. त्यालाही या घटनेनंतर नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पुढे काय कारवाई होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.