ब्रिटिश राजघराण्याच्या मानाच्या गादीवर गेली सात दशके विराजमान असलेल्या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वृद्धपकाळाने निधन झालं आहे. त्या 96 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. स्कॉटलंडमधील बाल्मोरल कॅसल या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रिटीश राजघराण्याकडून आणि ब्रिटन सरकारकडून त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात चार अपत्ये, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दरम्यान महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स आता ब्रिटनच्या गादीवर विराजमान होतील.
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मोदींनी महाराणी एलिझाबेथसोबतचा एक फोटो ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
महाराणी एलिझाबेथ द्वितीय या आपल्या काळातील एक दिग्गज म्हणून स्मरणात राहतील. त्यांनी देशाला आणि लोकांना प्रेरणादायी नेतृत्व दिले. त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा आणि सभ्यता दाखवली. त्यांच्या निधनाने मला दुख: झाले असून या दुःखाच्या प्रसंगी संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि ब्रिटनच्या लोकांसोबत आहेत.” असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.
Her Majesty Queen Elizabeth II will be remembered as a stalwart of our times. She provided inspiring leadership to her nation and people. She personified dignity and decency in public life. Pained by her demise. My thoughts are with her family and people of UK in this sad hour.
— Narendra Modi (@narendramodi) September 8, 2022
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म 21 एप्रिल 1926 साली लंडनमध्ये झाला. एलिझाबेथ यांचे शिक्षण घरातच झाले. 1952 साली एलिझाबेथ यांचे वडील जॉर्ज यांच्या निधनानंतर त्या ब्रिटनच्या महाराणी म्हणून गादीवर विराजमान झाल्या. 2 जून 1953 रोजी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यांना महाराणीचा मुकुट घालण्यात आला. त्यांनी सलग सात दशकं ब्रिटनच्या महाराणी म्हणून कार्यभार सांभाळला. त्यामुळे जगातील सर्वाधिक काळ महाराणी म्हणून सत्ता उपभोगणाऱ्या एलिझाबेथ ह्या एकमेव महिला सम्राज्ञी होत्या.
दरम्यान 20 नोव्हेंबर 1947 रोजी ग्रीक आणि डेन्मार्कचे राजकुमार प्रिन्स फिलिप यांच्याशी त्यांचा शाही विवाह झाला. त्यानंतर 14 नोव्हेंबर 1948 रोजी त्यांच्या प्रिन्स चार्ल्स या मुलाचा जन्म झाला. दरम्यान मागील वर्षी 9 एप्रिल 2021 मध्ये वयाच्या 99 व्या वर्षी त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांचे निधन झाले.
एलिझाबेथ यांनी फक्त ब्रिटनचे महाराणी पद भूषवले नाहीतर त्या ब्रिटीश राष्ट्रकुल परिषदेतील कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जमैका, बार्बाडोस, बहामास, ग्रेनेडा, पापुआ न्यू गिनी, सॉलोमन बेट समूह, तुवालू, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स, बेलिझ, ॲंटिगा आणि बार्बुडा, व सेंट किट्स आणि नेव्हिसया या 16 देशांची महाराणी होत्या.
एप्रिल 2020 मध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी देशाला कोरोनापासून वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. या काळात त्यांनाही कोरोनाची लागण झाली. मात्र यावर त्यांनी यशस्वी मात केली, परंतु वाढत्या वयामुळे त्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागत होता. यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे देखील त्यांनी टाळले. काही मोजक्या कार्यक्रमांना त्या उपस्थित राहत होत्या.