पीडित महिलांची माहिती देण्यासाठी राहुल गांधींनी मागितला वेळ : दिल्ली पोलीस

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधींनी श्रीनगर येथे महिलांविषयी केलेल्या वक्तव्याची माहिती घेण्यासाठी आज दिल्ली पोलीस त्यांच्या घरी पोहोचले होते. त्यानंतर राहुल गांधींनी दिल्ली पोलिसांना मेल करून 8-10 दिवसांचा वेळ मागितला आहे. राहुल गांधी म्हणाले की, मी ३० जानेवारीला एक वक्तव्य दिले होते आणि आता ४५ दिवसांनी दिल्ली पोलीस माझ्याकडून माहिती घेत आहेत.

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल श्रीनगरला पोहचले तेव्हा अनेक महिला राहुल गांधी यांना भेटल्या होत्या. त्या महिलांनी त्यांच्यावर बलात्कार आणि विनयभंग झाला आहे, असे राहुल गांधींना सांगितले होते. त्यामुळे दिल्ली पोलिसांना त्या महिलांची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी यांना नोटीस पाठवली होती. पण राहुल गांधींनी या नोटीसीला उत्तर दिले नव्हते.

विशेष म्हणजे, गेल्या पाच दिवसांत तिसऱ्यांदा पोलीस राहुल गांधींच्या घरी पोहोचल्यानंतर काही तासांनी राहुल गांधी यांनी चार पानांच्या उत्तरात 10 मुद्दे नमूद केले आहेत. यासोबतच त्यांनी 30 जानेवारीच्या वक्तव्याबाबत दिल्ली पोलिसांच्या नोटीसला सविस्तर उत्तर देण्यासाठी 8-10 दिवसांचा अवधी देखील मागितला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रे दरम्यान “महिलांचा लैंगिक छळ” बाबत केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना बजावलेल्या नोटीस संदर्भात दिल्ली पोलीसांनी आज काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या घरी चौकशी करण्यासाठी पोहचले होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, विशेष पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सागर प्रीत हुड्डा यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांचे पथक सकाळी 10 च्या सुमारास राहुल गांधींच्या 12, तुघलक लेन येथील निवासस्थानी पोहोचले, मात्र दोन तास होऊनही राहुल गांधी यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोलीस दल त्यांच्या घरून निघाले. सोशल मीडिया पोस्टची दखल घेत दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना प्रश्नावली पाठवली आणि त्यांना “लैंगिक छळाच्या तक्रारींसह त्यांच्याकडे आलेल्या महिलांचे तपशील देण्यास सांगितले आहे”.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘भारत जोडो यात्रा’ श्रीनगर पोहचली तेव्हा राहुल गांधींनी विधान केले होते की, “महिलांवर अजूनही लैंगिक अत्याचार होत असल्याचे मी ऐकले आहे.” अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांनी राहुल गांधींना या पीडितांची माहिती देण्यास सांगितले होते. जेणेकरून या महिलांना सुरक्षा प्रदान करता येईल. सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी दुपारी 4 च्या सुमारास प्राथमिक उत्तर पाठवत पोलिसांच्या कारवाईला “अभूतपूर्व” असे संबोधले आणि या कारवाईचा संसदेच्या आत आणि बाहेर अदानी प्रकरणावरील त्यांच्या भूमिकेशी काही संबंध आहे का, असे विचारले आहे.

तसेच राहुल गांधींनी त्यांच्या उत्तरात श्रीनगरमध्ये केलेल्या वक्तव्यानंतर ४५ दिवसांच्या कालावधीनंतर पोलिसांच्या ‘अचानक सक्रियते’वरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सत्ताधारी पक्षासह अन्य कोणत्याही राजकीय पक्षाची राजकीय प्रचाराबाबत अशा प्रकरणांमध्ये चौकशी किंवा चौकशी झाली आहे का, असा सवालही माजी काँग्रेस अध्यक्षांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.