राहुल गांधी बदल रहे है… आजी-माजी पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल

Rahul Gandhi | राहुल गांधी यांच्यातील कौटुंबिक वात्सल्य जगासमोर आले आहे. यावरूनच, ते बदलत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. एवढंच नव्हे तर आजी-माजी पंतप्रधानांच्या स्वभावाचं अनुकरण होत असल्याचंही बोललं जात आहे.

नवी दिल्ली – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांचे बंधुप्रेम सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ उत्तर प्रदेशकडे सरकत असताना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यातील भावा-बहिणीच्या प्रेमाची सुंदर अभिव्यक्ती पाहायला मिळाली. यामुळे राहुल गांधी यांच्यातील कौटुंबिक वात्सल्य जगासमोर आले आहे. यावरूनच, ते बदलत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. एवढंच नव्हे तर आजी-माजी पंतप्रधानांच्या स्वभावाचं अनुकरण होत असल्याचंही बोललं जात आहे.

राहुल गांधी यांच्या आई आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यातील आई-मुलामधील प्रेमाचं नातंही आपण अनेकदा अनुभवलं आहे. २८ डिसेंबर रोजी काँग्रेसचा १३८ वा स्थापना दिन झाला. यावेळी ते आईसोबत चिलिंग मूडमध्ये दिसले. आईच्या गालांना पकडून ते मस्ती करताना दिसले.

हेही वाचा – राहुल आणि प्रियंका गांधी यांचे बंधूप्रेम होतेय व्हायरल; पाहा व्हिडीओ

६ ऑक्टोबर रोजी भारत जोडो यात्रा कर्नाटकात होती. त्यावेळी सोनिया गांधी यांनीही या यात्रेत सहभाग घेतला होता. राहुल गांधी यांच्यासोबत चालताना सोनिया गांधी यांच्या शूजची लेस निघाली. तेव्हा भररस्त्यात राहुल गांधींनी खाली वाकत त्यांच्या शूजची लेस बांधली. हा व्हिडीओ तेव्हा प्रचंड व्हायरल झाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या आईसोबतचे अनेक चांगले क्षण सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.  हिराबेन मोदी यांचा वाढदिवस असो किंवा इतर कोणतेही खास क्षण असो पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आईचे आर्शीवाद घेण्यासाठी जात असत. आईच्या भेटीचे फोटोही ते सोशल मीडियावर पोस्ट करत असत. त्यांच्या आईचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर, त्यांनी आईसाठी खास पत्रही लिहिले होते.

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलांचा प्रचंड लळा होता. त्यामुळे त्यांच्या जयंतीदिनी बालदिन साजरा केला जातो. त्यांचा हाच गुण राहुल गांधी यांच्यातही काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाला. भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये पोहोचली तेव्हा सर्वेश हाटणे नावाचा विद्यार्थी त्यांच्या भेटीसाठी आला होता. त्याला सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याची इच्छा आहे. मात्र, त्याने संगणक पाहिलाच नव्हता. त्यामुळे त्या मुलाप्रती संवेदनशीलता दाखवत राहुल गांधींनी त्याला लॅपटॉप भेट दिला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्यासह काही काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत त्या लहानग्या सर्वेशनला लॅपटॉप भेट देण्यात आला.

हेही वाचा कॉम्प्युटर पाहिला नाही, पण सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याचं स्वप्न; राहुल गांधींनी मुलाला दिला मदतीचा हात

दरम्यान, पुढच्या निवडणुकीसाठी राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे दावेदार असल्याचं काँग्रेसच्या नेतेमंडळीकडून सांगण्यात येतंय. तसंच, २०२४ मध्ये राहुल गांधीच पंतप्रधान होणार असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.  राहुल गांधीही आजी-माजी पंतप्रधानांच्या स्वभाव-गुणांचं अनुकरण करत आहे. त्यामुळे ते खरंच पंतप्रधान होण्याची तयारी करत आहेत का असा प्रश्न समाजमाध्यमांवरून विचारला जात आहे.