आप सरकार पूर्णपणे फेल ठरलेय, सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबियांची भेट घेत राहुल गांधींची टीका

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Panjabi Singer Siddhu Musewala)यांची अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर देशभरात विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. या प्रकरणी पोलिसांनी  (Police) तात्काळ कारवाई करत काही संशयितांना अटक केली आहे. मात्र, मुसेवाला हत्याकांडाचे आता पुणे कनेक्शन समोर आले आहेत. अशातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबियांची भेट घेत पंजाबमधील सरकारवर टीका केली आहे.

आप सरकार पूर्णपणे फेल ठरलेय

राहुल गांधी यांनी ट्विट करत पंजाब सरकारवर टीका केली आहे. आप सरकार पूर्णपणे फेल ठरलीय, अशा प्रकारचं ट्विट राहुल गांधींनी केलंय. सिद्धू मुसेवाला यांच्या आई-वडिलांना ज्या दु:खाचा सामना करावा लागत आहे, ते शब्दात सांगणे कठीण आहे. त्यांना न्याय देणे आमचे कर्तव्य आहे आणि आम्ही पार पाडू. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. आप सरकार पंजाबमध्ये शांतता राखण्यात अपयशी ठरले आहे, अशा प्रकारच ट्विट राहुल गांधींनी करत पंजाब सरकारवर निशाणा साधला आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकीत सिद्धू मूसवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा गावातून निवडणूक लढवली होती. याआधीही राजस्थानचे नेते सचिन पायलट यांच्यासह अनेक नेत्यांनी गायकाच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. ही घटना घडली तेव्हा राहुल गांधी परदेशात होते आणि दोन दिवसांपूर्वीच ते मायदेशी परतले आहेत. मायदेशी परतल्यानंतर राहुल गांधींनी आप सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत शोक व्यक्त केला होता. तसेच काँग्रेसच्या शिष्टमंडळाने देखील पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतली होती.

मुसेवालाच्या शरीरावर तब्बल २३ जखमा आढळून आल्या आहेत. मात्र, आता मुसेवाला हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पंजाब पोलिसांनी ८ शार्प शूटर्सची ओळखी पटवली आहे. यामध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. या प्रकरणात पुणे कनेक्शन आता समोर आलं असून ८ शार्प शूटर्सपैकी दोघेजण पुण्याचे असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे.


हेही वाचा : गायक सिद्धू मुसेवालावर गोळ्या झाडणारे दोन संशयित शूटर पुणेकर; पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी