Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश राहुल गांधी हाच मुद्दा... पण विरोधकांच्या एकजुटीतून शिवसेना 'आऊट' अन् तृणमूल 'इन'

राहुल गांधी हाच मुद्दा… पण विरोधकांच्या एकजुटीतून शिवसेना ‘आऊट’ अन् तृणमूल ‘इन’

Subscribe

मुंबई : खासदारकी रद्द झाल्यानंतर स्वत: राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसला विरोधी पक्षाची साथही मिळाली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत चार हात लांब राहणाऱ्या तृणमूल काँग्रेसने आज, सोमवारी काँग्रेसला साथ दिली. तर, दुसरीकडे भाजपाशी फारकत घेत काँग्रेसशी हातमिळवणी करणाऱ्या शिवसेनेने मात्र यापासून लांब राहण्याची भूमिका घेतली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंग्लंडमध्ये मोदी सरकारबाबत केलेल्या वक्तव्यावरून संसदेमध्ये सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आक्रमक झाली होती. या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसबरोबरच भाजपावरही निशाणा साधताना, भाजपाकडून राहुल गांधी यांना ‘हीरो’ बनविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता. ज्वलंत मुद्द्यांवरून सर्वांचे लक्ष हटवण्यासाठी भाजपा हे सर्व करत असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

- Advertisement -

त्याचबरोबर पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने हातमिळवणी केली आहे. तथापि, तिसरी आघाडी तयार करतानाच भाजपा तसेच काँग्रेसलाही दोन हात लांब ठेवण्याचा निर्णय या दोन्ही पक्षांनी घेतला आहे. अशा परिस्थितीत तृणमूल काँग्रेसने अचानक आज, सोमवारी काँग्रेसने बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीला हजेरी तर लावलीच, पण त्याचबरोबर काळे कपडे परिधान करून काँग्रेसने केलेल्या निषेध आंदोलनात तृणमूलच्या खासदारांनी सहभागही घेतला.

- Advertisement -

असहमती ते इशारा… शिवसेनेची बदलती भूमिका
तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवीद काँग्रेसला बरोबर घेत महाविकास आघाडी स्थापन करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडामुळे सत्ता सोडावी लागली. या बंडांचे मूळ वरकरणी तरी दोन्ही काँग्रेसबरोबर उद्धव ठाकरे यांनी केलेला घरोबा हाच आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेसची साथ सोडली नाही तसेच दोन्ही काँग्रेसनेही उद्धव ठाकरे यांची कायमच पाठराखण केली आहे.

तथापि, खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, ‘मी माफी मागायला सावरकर नाही,’ असे वक्तव्य त्यांनी केले. त्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने संताप व्यक्त केला. यापूर्वी देखील ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात आली असताना नोव्हेंबरमध्ये राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आपण असहमत असल्याचे म्हटले होते. मात्र आता पुन्हा राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वक्तव्य केले असता, ‘सावरकरांचा अपमान सहन करणार नाही,’ असा जाहीर इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला. हा इशारा देऊन ठाकरे गट थांबलेला नाही तर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या खासदारांसाठी रात्री स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. त्यावर ठाकरे गट बहिष्कार घालणार असल्याचे समोर आले आहे.

एकूणच राहुल गांधी यांच्या मुदद्यावरून विरोधकांच्या एकजुटीला तृणमूल काँग्रेसच्या एन्ट्रीने बळ मिळाले असे चित्र असतानाच, शिवसेना ‘आऊट’ झाल्याने राज्यातील महाविकास आघाडीबद्दली चर्चा सुरू झाली आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -