सर्जिकल स्ट्राईकवर दिग्विजय सिंहांचा सवाल, राहुल गांधींनी दिलं उत्तर अन् जाहीर केली काँग्रेसची भूमिका

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोदी सरकार खोटं बोलत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर देत काँग्रेस पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. काँग्रेस पक्ष दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही काँग्रेस पक्षाने यावर आपलं मत मांडत पक्षाची भूमिका जाहीर केल्याचं म्हटलं आहे.

मंगळवारी जम्मू काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान दिग्विजय सिंह यांच्या सर्जिकल स्ट्राईकच्या वक्तव्यावर राहुल गांधी यांनी भाष्य केलं. राहुल गांधी म्हणाले की, दिग्विजय सिंह यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. आम्ही लष्कराचा आदर करतो आणि लष्कराच्या शौर्यावर कोणताही प्रश्न नाही.

यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केलेले विचार त्यांचे स्वत:चे असून ही काँग्रेसची भूमिका नाही. 2014 पूर्वी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने सर्जिकल स्ट्राईक केले होते. राष्ट्रहितासाठी केलेल्या सर्व लष्करी कारवायांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे आणि यापुढेही राहील. सर्जिकल स्ट्राइकवरील सर्व गोंधळाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांच्या पक्षाने दिली आहेत. त्यामुळे मीडियाने आता पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याची गरज आहे.

सर्जिकल स्ट्राईकच्या वक्तव्यानंतर दिग्विजय सिंह यांच्यावर भाजपने हल्लाबोल केला आहे. यावर प्रतिक्रिया देत भाजपने म्हटले की, विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल द्वेष पसरवण्यात आंधळा झाला आहे. त्यांनी सशस्त्र दलांचा “अपमान” केला आहे.


एअर इंडियाला आता दहा लाखांचा दंड; विमान प्राधिकरणाला माहिती न दिल्याचा ठपका