घराचा पत्ता लोककल्याण मार्ग ठेवल्याने लोकांचे भले होत नाही; राहुल गांधीचा मोदींवर निशाणा

काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी ट्विट करत मोदी सरकारला धारेवर धरलं आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (Employee provident fund) ठेवींवरील व्याजदर (Interest rate) २०२१-२२ साठी ८.१ टक्के ठेवण्यात आला आहे. गेल्या ४० वर्षांतील सर्वाधिक कमी व्याजदर असल्याचं म्हटलं जात आहे. ८.५ टक्क्यांवरून थेट ८.१ टक्के व्याजदर करण्यात आल्याने केंद्र सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला आहे. त्यातच, काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनीही ट्विट करत मोदी सरकारला धारेवर धरलं आहे.

“घराचा पत्ता लोक कल्याण मार्ग (Lok kalyan road) ठेवल्याने लोकांचे भले होत नाही. साडेसहा कोटी कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधानांनी वर्तमान आणि भविष्याला उद्ध्वस्त करण्यासाठी ‘महागाई वाढवा, कमाई कमी करा’ हे मॉडेल लागू केले आहे, असं ट्विट करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या पीएफवर (PF) २०२१-२२ साठी ८.१ टक्के व्याज ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला प्रचंड विरोध झाला. मात्र, तरीही केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे संमतीसाठी पाठवला. या प्रस्तावाला शुक्रवारी ईपीएफओ कार्यालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे.

‘देशात आधी २२ टक्के लोकसंख्या गरीब असायची. मात्र, आता ८ वर्षानंतर हा आकडा १० टक्क्यांवर आला आहे’, असा दावा भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन (shahanwaz Hussain) यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या मार्गावर आम्ही देशाला पुढे नेत आहोत.