घरCORONA UPDATE...तर देशात बेरोजगारीची त्सुनामी येईल - राहुल गांधी

…तर देशात बेरोजगारीची त्सुनामी येईल – राहुल गांधी

Subscribe

गेल्या दीड महिन्यापासून देश लॉकडाऊनमध्ये असून मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे बंद आहेत. या पार्श्वभूमीवर देशात आर्थिक संकट आ वासून उभं राहण्याची शक्यता अनेक अर्थतज्ज्ञांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर आज घेतलेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी महत्त्वाची भिती व्यक्त केली आहे. ‘ही टीका करण्याची वेळ नाही. ज्या परिस्थितीत आपण आत्ता आहोत, त्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. लॉकडाऊनची गरज होती, तो झाला. पण आता तो उघडण्याच्या नियोजनाची गरज आहे. स्थलांतरीतांना, गरीबांना आज पैशांची मदत करायला हवी आहे. नाहीतर बेरोजगारी एक त्सुनामी होऊन जाईल’, असं ते म्हणाले.

गरीबांच्या खात्यात ७ हजार ५०० रुपये जमा करा!

यावर अधिक सांगताना राहुल गांधी म्हणाले, ‘देशातल्या किमान ५० टक्के गरिबांच्या खात्यात सरकारने किमान ७ हजार ५०० रुपये जमा करायला हवेत. आणि हे उद्या किंवा परवा करण्याची गोष्ट नसून तातडीने ती गोष्ट करायला हवी. हे पैसे जमा करायला साधारण ६५ हजार कोटी लागतील. ही भारतासाठी या संकटकाळात फार मोठी रक्कम नाही. आजच्या परिस्थितीत लोकांचा त्रास कमी होणं ही सध्याची सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. देशातल्या रोजगार निर्माण करणाऱ्या उद्योगधंद्यांना आपण आर्थिक सुरक्षा देणं गरजेचं आहे. नाहीतर आपण भयानक संकटात सापडू’, असं राहुल गांधींनी नमूद केलं.

- Advertisement -

लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हायला हवा

दरम्यान, यावेळी बोलताना राहुल गांधींनी जनतेमध्ये विश्वासाचं वातावरण नसल्याच्या मुद्द्याचा पुनरुच्चार केला. ‘सरकारने लॉकडाऊन उघडण्याचे निकष जाहीर करायला हवेत. लोकांना कळायला हवं की ही परिस्थिती कधी बदलणार आहे. शिवाय, लोकांमध्ये या आजाराविषयी भितीचं वातावरण आहे. त्यामुळे लोकांमधल्या या भितीला दूर करून विश्वासाचं वातावरण निर्माण होणं गरजेचं आहे’, असं ते म्हणाले.

‘फक्त सक्षम पंतप्रधान असून भागणार नाही. सक्षम सचिव, सक्षम मुख्यमंत्री, सक्षम जिल्हाधिकारी, सक्षम आयुक्त हवे आहेत. ज्या ज्या ठिकाणी कोरोनाशी लढा होईल, तिथे आपली सक्षम माणसं त्याच्याशी लढायला हवीत’, असं देखील राहुल गांधींनी नमूद केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -