राहुल गांधी यांनी…, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इंग्लंडमधील भाषणाबाबत दिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी इंग्लंडमध्ये विविध कार्यक्रमात देशातील मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार टीका केली. त्याला आज, मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी वास्तविकतेचे भान ठेवून अधिक जबाबदारीने वक्तव्य करण्याची गरज आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे (Dattatreya Hosabale) यांनी सांगितले.

भारतातील लोकशाही प्रक्रियेचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आरएसएस नावाची संघटना आहे, जी एक कट्टरवादी आहे. मुळात मोदी सरकारने भारतातील सर्व संस्था ताब्यात घेतल्या असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी इंग्लंडमध्ये एका कार्यक्रमात केला होता. त्यावर दत्तात्रेय होसबळे म्हणाले की, यावर काही टिप्पणी करण्याची काही गरज वाटत नाही. ते आपला राजकीय अजेंडा राबवत आहेत. आमची त्यांच्याशी कोणतीही स्पर्धा नाही.

राहुल गांधी संघाविषयी बोलतात, त्यावर मी एवढेच सांगेन की, त्यांच्या काँग्रेसच्या पूर्वजांनी संघावर अनेक टीकाटिप्पणी केली आहे. पण देशातील आणि जगातील नागरिक संघाकडे स्वतःच्या अनुभवातून पाहात आहे आणि त्यातून शिकत आहेत. कदाचित त्यांनाही माहीत असेल. मला एवढेच म्हणायचे आहे की, विरोधी पक्षातील प्रमुख राजकीय नेता म्हणून त्यांनी अधिक जबाबदारी दाखवावी आणि वास्तव पाहावे, असे दत्तात्रेय होसबळे म्हणाले.

राहुल गांधींनी मोदी सरकारवर केली होती टीका
लोकसभेतील विरोधी सदस्यांचे माईक अनेकदा बंद केले जात असल्याचा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लंडनमधील संसद भवनात ब्रिटिश खासदारांना संबोधित करताना मोदी सरकारवर केला होता. आमचे माइक खराब होत नाहीत, ते काम करतात, परंतु आम्ही ते चालू करू शकत नाही. मी बोलत असताना हे माझ्यासोबत अनेकदा घडले असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला होता.