राहुल गांधींचे स्लिप ऑफ टंग, दहशतवाद्याचे पुढे लावले ‘जी’

rahul gandhi tweet after ayodhya ram temple bhoomi pujan
राहुल गांधी

दिल्लीमध्ये झालेल्या काँग्रेसच्या कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप जोरदार टीका करत आहे. या कार्यक्रमात भाषणा दरम्यान, राहुल गांधी पुलवामा हल्ला आणि मसूद अजहरच्या मुद्द्यावरुन भाजपवर लक्ष्य करत होते. त्याच दरम्यान, त्यांच्या तोंडातून मसूद अजहरजी असा शब्द आला. याच मुद्द्यावर भाजपने राहुल गांधींना ट्विटवर चांगलेच ट्रोल केले आहे.

राहुल गांधी यांनी भाषणा दरम्यान असे म्हटले होते की, “पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या बसवर कोणी बॉम्ब फोडला. जैश-ए-मोहम्मद, मसूद अजहर. ५६ इंच छातीवाले, सगळ्यांना माहिती असेल जेव्हा त्यांचे मागचे सरकार होते. तेव्हा एअरक्राफ्टमध्ये मसूद अजहरजीसोबत बसून जे आज एनएसए आहेत. अजीत डोवाल मसूद अजहरला कंधारमध्ये सोडून येतात.”

राहुल गांधींच्या या भाषणावर भाजपने त्यांना चांगलेच टार्गेट केले आहे. भाजपने ट्विटरवरुन राहुल गांधींवर टीका केली आहे. “देशाच्या ४४ जवानांच्या शहीद होण्याला जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखासाठी राहुल गांधी यांच्या मनात सन्मान आहे!”#RahulLovesTerrorists

आज दिल्लीतीच्या इंदिरा गांधी स्टेडिअमवर काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात राहुल गांधी भाषण देत असताना त्यांनी पुलवामा हल्ल्यावरुन भाजप आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांच्यावर टीका केली. त्यावेळी त्यांनी जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याला मसूद अजहरजी असे बोलले त्यामुळे त्यांच्यावर भाजपने टीकेची झोड सुरु केली आहे.