मोदी आडनाव बदनामी प्रकरणात राहुल गांधींना २ वर्षांची शिक्षा; जामीनही मंजूर

मोदी आडनाव बदनामी प्रकरणी सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना या प्रकरणात सुरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Rahul Gandhi sentenced to 2 years in Modi surname defamation case

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी मोदी आडनावावर भाष्य करताना म्हटले होते की, सर्व चोरांचे आडनाव मोदी आहे का?. या प्रकरणी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सुरतच्या न्यायालयाने सकाळी 11 वाजता निकाल देत राहुल गांधींना दोषी ठरवले आहे. या प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. तर या प्रकरणात त्यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देखील मंजूर करण्यात आला आहे.

सुरतच्या सीजेएम कोर्टात पोहोचल्यावर कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी ठरवले. यानंतर कोर्टाने राहुल गांधींना विचारले की तुम्हाला काय म्हणायचे आहे, तेव्हा राहुल गांधी म्हणाले, मी नेहमीच भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतो. मी मुद्दाम कोणाच्या विरोधात बोललो नाही. यामुळे कोणाचेही नुकसान झाले नाही.

काय आहे प्रकरण?
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी हे कर्नाटकातील कोलारमध्ये म्हणाले होते की, “सर्व चोरांची आडनावे मोदी कशी आहेत?” राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर सुरत पश्चिमेतील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी मोदी समाजाचा अपमान केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. यानंतर हे प्रकरण सुरतच्या न्यायालयात पोहोचले. या प्रकरणात राहुल गांधी यांना याआधी 9 जुलै 2020 रोजी सुरत न्यायालयात हजर राहावे लागले होते. तर गेल्या महिन्यात पूर्णेश मोदी यांनी या प्रकरणी लवकर निर्णय घेण्यासाठी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, यानंतर उच्च न्यायालयाने सुरत न्यायालयाला लवकरात लवकर सुनावणी घेण्याचे आदेश देताना उच्च न्यायालयात सुनावणीसाठी केलेला अर्ज फेटाळला होता. त्यानंतर गेल्या महिनाभरापासून सुरत न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यामध्ये दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांच्या वकिलाने मोदी हे कोणताही विशिष्ट जातीचा समुदाय नसल्याचे म्हटले होते. राहुल गांधींचे सर्व आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच होते. अशावेळी त्यांनी मानहानीचा खटला दाखल करावा. यानंतर सुरत कोर्टातील मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांनी निकालासाठी २३ मार्च ही तारीख निश्चित केली होती. त्यानुसार आज सुनावणी करत राहुल गांधी यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.


हेही वाचा – सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, सत्ताधारी आमदारांनी राहुल गांधींच्या फोटोला चप्पल मारली