नोटबंदी, GSTमुळे अर्थव्यवस्थेची वाताहत; अर्थमंत्र्याच्या ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’वर राहुल गांधींचा हल्ला

Rahul gandhi slam fm nirmala sitharaman on act of god statement

जीएसटी परिषदेची गुरुवारी २७ ऑगस्टला ४१ वी बैठक झाली. या बैठकीनंतर करोनाची आपत्ती ही ‘देवाची करणी’ (Act of God) असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असे सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना जीएसटीची नुकसानभरपाई देण्यास केंद्र सक्षम नसल्याचे सांगितले. यावर आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना लक्ष्य केले आहे. राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “नोटाबंदी-जीएसटी आणि अयशस्वी लॉकडाऊन या तीन मोठ्या कारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. याशिवाय जे काही सांगितले जात आहे ते खोटे आहे.” राहुल गांधी सतत अर्थव्यवस्थेच्या मुद्यावर केंद्र सरकारवर हल्ला करत आहेत.

दरम्यान, जीएसटी परिषदेच्या बैठकीत जीएसटी संकलनाचा मुद्दा राज्य सरकारांनी केंद्रासमोर उपस्थित केला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बैठकीला संबोधित करताना सांगितले की जीएसटी संकलनावर कोरोना विषाणूच्या साथीचा फार वाईट परिणाम झाला आहे. कोरोना विषाणूच्या रूपाने अस्तित्वात आलेल्या असामान्य ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ला देशाच्या अर्थव्यवस्थेला सामोरे जावे लागले आहे आणि यामुळे यावर्षी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर कमी होऊ शकेल. या विधानामुळे निर्मला सीतारमणसुद्धा ट्रोल झाल्या होत्या. निर्मला यांच्या या विधानामुळे खळबळ उडाली आणि त्यांना विरोधकांनी लक्ष्य केले. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील त्यांच्यावर निशाणा साधला.


हेही वाचा – IPL 2020: बीसीसीआयला धक्का; CSK च्या गोलंदाजासह १२ जण कोरोना पॉझिटिव्ह