सरकारने शेतकरी, मजुरांच्या खिशात पैसे द्यावेत : राहुल गांधी

लॉकडाऊन जास्त दिवस ठेऊन चालणार नाही. सावधगिरीने लॉकडाऊन शिथील करण्याची गरज असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

congress president Rahul Gandhi
कॉंग्रेस नेते राहुल गांधी

नुसतं पॅकेज जाहीर करून चाणार नाही तर त्यांच्या खिशात पैसे जायला हवेत. सरकारनं रेटिंग्स तसंच जगातील प्रतिमेचा विचार आज या काळात करु नये.  अशी मागणी खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. आज राहूल गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. मागणी आणि पुरवठ्याचं गणित सुधारण्यासाठी पैसे देणं गरजेचं आहे. हे पैसे राज्य सरकार अथवा केंद्र सरकारमार्फत द्या किंवा कसेही द्या पण पैसे द्या,माझ्या मते त्यांनी राज्य सरकारांच्या माध्यमातून काम करण्याची गरज आहे,” असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. तसंच सावधगिरीनं लॉकडाऊन शिथिल करण्याची गरज आहे, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी म्हणाले की, शेतकरी, मजुरांनी हा देश उभा केला आहे. या काळात त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. शेतकरी, मजुर, कष्टकरी हा अर्थकारणाचा पाया आहे. त्यांना सरकारने मदत करायलाच हवी. नुसतं पॅकेज जाहीर करून चाणार नाही तर त्यांच्या खिशात पैसे जायला हवेत, असं ते म्हणाले. लोकांच्या खिशात जर पैसे नसतील तर लोक काय खाणार? असा सवाल राहूल गांधी यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले की, भारताच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करु नका, ते रेटिंग नंतर सुधारु शकेल. सध्या भारताच्या मजूर, शेतकऱ्यांच्या काळजीचा विषय आहे. ते सध्या संकटात आहेत, त्यांना आधार द्या, रेटिंग आपोआप सुधारेल, असं राहुल गांधी म्हणाले.

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नालाही राहूल यांनी उत्तरे दिली. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. याच पार्श्वभूमीवर एका पत्रकाराने  महाराष्ट्राला केंद्राने अधिक मदत करायला हवी का अशा संदर्भातील प्रश्न राहुल गांधी यांना विचारला. याचे उत्तर देताना राहूल गांधी म्हणाले, महाराष्ट्र हे एक मोठं राज्य तर आहे.महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे महाराष्ट्राला केंद्राचा पूर्ण पाठींबा मिळायला हवा.

लॉकडाऊन हा इव्हेंट नाही

लॉकडाऊन जास्त दिवस ठेऊन चालणार नाही. सावधगिरीने लॉकडाऊन शिथील करण्याची गरज असल्याचं राहुल गांधी म्हणाले. लॉकडाउन हा काही इव्हेंट नाही तर ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेताना विशेष काळजी घेऊन योग्य त्या रणनितीनुसारच पुढेही निर्णय घ्यावा लागेल, असेही राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे.


हे ही वाचा – क्वारंटाईन सेंटरमधून पळाला आणि त्याने घरी येऊन पत्नीचा हातच कापला, कारण….