“प्रधानमंत्री जी, आखिर इतना डर क्यों?;” अदानीच्या चौकशीवरून राहुल गांधींचा मोदींना प्रश्न

मोदी आडनावावरून वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचे खासदारकी पद रिक्त करण्यात आले आहे. पण यामुळे आता काँग्रेसने आणि राहुल गांधी यांनी अदानीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्यास सुरूवात केली आहे.

Congress press conference on Modi-Adani
३१ मार्च रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत काॅंग्रेस पत्रकार परिषद घेणार

राहुल गांधी यांचे खासदारकी पद रद्द करण्यात आले आहे. मोदी आडनावावरून वादग्रस्त वक्तव्ये करणे हे त्यांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी सुरतच्या जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाकडून लगेत दुसऱ्या दिवशी त्यांचे खासदारकी पद रद्द करण्यात आले आहे. पण या कारवाईमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. देशभरात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आंदोलन केले जात आहे. दरम्यान, कारवाई होऊन सुद्धा राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधणे थांबवले नसल्याचेच दिसून येत आहे.

राहुल गांधी यांनी खासदारकी पद रद्द झाल्यानंतर मी प्रत्येक किंमत चुकवायला तयार आहे, अशा आशयाचे ट्वीट केले होते. पण आज (ता. 27 मार्च) राहुल गांधी यांनी एक ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. तर उद्योजक गौतम अदानी यांना पंतप्रधान इतके का घाबरतात? असा प्रश्न त्यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, “LIC की पूंजी, अडानी को!.. SBI की पूंजी, अडानी को!.. EPFO की पूंजी भी, अडानी को!.. ‘मोडानी’ के खुलासे के बाद भी, जनता के रिटायरमेंट का पैसा अडानी की कंपनियों में निवेश क्यों किया जा रहा है?… प्रधानमंत्री जी, न जांच, न जवाब! आख़िर इतना डर क्यों?” याआधी सुद्धा संसदेत राहुल गांधी यांनी यावरून पंतप्रधानांना प्रश्न विचारले होते. पण ज्यानंतर संसदेत गदारोळ झाल्याने संसदेतील कामकाज तहकूब करण्यात आले होते.

दरम्यान, याच मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केला आहे. तर मोदींनी याची उत्तरे द्यावीत, अशी मागणी केली आहे. अमेरिकेची संस्था असलेल्या हिंडेनबर्गने एक अहवाल सादर केला होता. ज्यानंतर अदानी कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होण्यास सुरूवात झाली आणि ज्यामुळे अदानी हे श्रीमंतांच्या यादीतून देखील बाहेर पडले. पण अदानी यांनी केलेल्या घोटाळ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून वारंवार करण्यात येऊ लागली आहे.


हेही वाचा –सावरकर आणि राहुल गांधी; उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा डाव