राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर केलेले आरोप संसदेच्या कामकाजातून वगळले

Rahul Shewale | रिया चक्रवर्तीला एयू नावाने आलेले ४४ कॉल आदित्य उद्धव ठाकरेंचे होते असा बिहार पोलिसांचा चौकशी अहवाल राहुल शेवाळेंनी लोकसभेत सादर केला. यावरून लोकसभेत बराच गदारोळ झाला. मात्र, राहुल शेवाळेंनी केलेल आरोप संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आले आहेत.

rahul shewale

नवी दिल्ली – सुशांतसिंह मृत्यूप्रकरणात (Sushant Singh Death Case) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी गंभीर आरोप केले आहेत. बिहार पोलिसांच्या चौकशीत समोर आलेली बाब राहुल शेवाळेंनी लोकसभेत सादर केली. रिया चक्रवर्तीला एयू नावाने आलेले ४४ कॉल आदित्य उद्धव ठाकरेंचे होते असा बिहार पोलिसांचा चौकशी अहवाल राहुल शेवाळेंनी लोकसभेत सादर केला. यावरून लोकसभेत बराच गदारोळ झाला. मात्र, राहुल शेवाळेंनी केलेल आरोप संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आले आहेत.

राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. याप्रकरणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राहुल शेवाळे यांच्या आरोपांवर हरकत घेतली. तसंच, सभापतींकडे विनंती करून राहुल शेवाळेंनी केलेले आरोप संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आले आहे.

हेही वाचा – सुशांतसिंह मृत्यूप्रकरण : आदित्य ठाकरेंवर राहुल शेवाळेंचे लोकसभेत गंभीर आरोप

शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले की, शिंदे गटाच्या एका खासदाराने सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान यांच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे आरोपी आहेत, असं दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न अत्यंत निधेषार्ह आहे. आम्ही माननीय सभापतींकडे याबाबत हरकत घेतली. आदित्य ठाकरेंबाबत केलेला उल्लेख सभागृहाच्या कामकाजातून वगळण्याचा आग्रह धरला. यानंतर सभापतींनी आमची मागणी मान्य केली. पण गद्दार गटाच्या खासदाराचा मला धिक्कार करावासा वाटतो.”

राहुल शेवाळेंचे आरोप काय?

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणाची चौकशी तीन पातळ्यांवर झाली. मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि सीबीआयकडून याप्रकरणाची चौकशी झाली. मात्र, तिन्ही यंत्रणांकडून आलेल्या अहवालात तफावत आहे. सुशांतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला एयू नावाने ४४ कॉल आले होते. या ‘एयू’बाबत मुंबई पोलिसांनी वेगळा अहवाल दिला होता. तर, बिहार पोलिसांनुसार ‘एयू’ म्हणजे ‘आदित्य उद्धव’ आहे. सीबीआयने एयूबाबत अहवाल दिलेला नाही. त्यामुळे रिया चक्रवर्तीला  कॉल केलेला एयू नक्की कोण याची माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली आहे.

लोकसभेतून बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळीही त्यांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा अहवाल सार्वजनिक करावा अशी मागणी केंद्रीय यंत्रणांकडे केली आहे. तसंच, आपला कोणावरही आरोप नसून चौकशी अहवालातून जे समोर आलंय ती माहिती सभागृहात सादर केली आणि त्यानुसारच या प्रकरणाची माहिती मागवण्यात आली आहे, असं राहुल शेवाळे म्हणाले.