घरदेश-विदेशबंगालमध्ये लोकल सुरु करण्यास रेल्वे मंत्रालयाची परवानगी; मुंबईकर प्रतिक्षेत

बंगालमध्ये लोकल सुरु करण्यास रेल्वे मंत्रालयाची परवानगी; मुंबईकर प्रतिक्षेत

Subscribe

लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आलेली मुंबईची लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी अद्याप सुरु झालेली नाही आहे. मुंबईकर अद्याप लोकल सेवा सुरु होण्याच्या प्रतिक्षेत असताना पश्चिम बंगालमध्ये उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली आहे. ११ नोव्हेंबरपासून बंगालमध्ये लोकल सेवा सुरु होणार आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. बंगालमध्येही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले सात महिने लोकल सेवा बंद होती.

लोकल सेवा सुरु करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकार आणि पूर्व रेल्वेमध्ये मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणती काळजी घ्यायला हवी यासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर लोकल सेवा सुरळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साऊथ ईस्टर्न रेल्वेला लोकल सेवा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विट करत ११ नोव्हेंबरपासून बंगालमध्ये लोकल सेवा सुरु होणार असल्याची माहिती दिली.

- Advertisement -

“११ नोव्हेंबरपासून पश्चिम बंगालमधील उपनगरीय सेवा पुन्हा सुरु होत आहे. कोरोनासंबंधी सुरक्षेच्या सर्व नियमांची अंमलबजावणी करत प्रवासांना विना अडथळा प्रवास करता येईल याची काळजी घेतली जाईल,” असे पियूष गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


मुंबईकर प्रतिक्षेत

मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा लॉकडाऊन लागू झाल्यापासून बंद आहे. सर्वसामन्य नागरिक लोकल सुरु करण्याची मागणी गेले काही महिने करत आहेत. त्यानंतर राज्य सरकारने केंद्राला काही दिवसांपूर्वी पत्र लिहून लोकल सुरु करण्याची विनंती केली होती. मात्र, अद्याप रेल्वे मंत्रालय लोकल सेवा सुरु करत नाही आहे. राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रेल्वेकडून त्रुटी काढण्याचे काम केले जात असल्याचा आरोप नुकताच मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला होता.. वडेट्टीवारांच्या या आरोपाला मध्य रेल्वेने ट्विटरद्वारे उत्तर देत २८ ऑक्टोबरला राज्य सरकारला पत्राद्वारे उत्तर देऊनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता राज्य सरकार आणि केंद्र यांच्या आरोप-प्रत्यारोपात मुंबईची लोकल सेवा केव्हा सुरु होईल याकडे सर्व मुंबईकर लक्ष लावून आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -