18 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन, ‘या’ मुद्द्यांवरून सरकारला घेरणार विरोधक

parlment

संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. लोकसभा सचिवालयाने गुरुवारी ही माहिती दिली. लोकसभा सचिवालयाच्या निवेदनानुसार, 17 व्या लोकसभेचे नववे अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालण्याची शक्यता आहे.

त्याचवेळी, राज्यसभा सचिवालयाच्या बातमीपत्रमध्ये म्हटले आहे की राज्यसभेचे 257 वे अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत असल्याने संसदेचे हे पावसाळी अधिवेशन विशेष ठरणार आहे. 18 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान पावसाळी अधिवेशनात एकूण 17 कामकाजाचे दिवस आहेत.

अधिवेशनात होईल राष्ट्रपती,उपराष्ट्रपती पदाची निवडणूक –

अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या 18 बैठका होतील. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होईल आणि 21 जुलै रोजी मतमोजणी केली जाईल. नवे राष्ट्रपती 25 जुलै रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमधील कार्यालयात पदाची शपथ घेतील. तसेच उपराष्ट्रपतींची निवडणूक 6 ऑगस्ट रोजी होईल. नवे उपराष्ट्रपती 11 ऑगस्टला कार्यभार स्वीकारतील, असे लोकसभा सचिवालयाच्या पत्रकात म्हटले आहे.

सरकारला या मुद्यावर विरोधक घेरण्याची शक्यता –

या अधिवेशनात सरकार अनेक विधेयके सभागृहात मांडू शकते. यामध्ये संसदीय समितीसमोर विचारार्थ पाठवलेल्या ४ विधेयकांचा समावेश आहे.संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रवर्तन संचलनालयाकडून राहुल गांधींची चौकशी, महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून सरकारला घेरू शकते.