Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश राज ठाकरेंनी केलं ममता दीदी आणि स्टॅलिन यांचं 'मनसे'अभिनंदन

राज ठाकरेंनी केलं ममता दीदी आणि स्टॅलिन यांचं ‘मनसे’अभिनंदन

Related Story

- Advertisement -

देशाचं लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जीच मुख्यमंत्री पदी विराजमान होणार हे आता निश्चित झालं आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे.

राज ठाकरे यांनी ट्विट करत ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. “पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या लक्षणीय यशसाठी ममता बॅनर्जीचं अत्यंत मनापासून अभिनंदन. संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे आणि या निवडणुकीत संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवलं. कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची खूप मोठी परंपरा या बाबतीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल यांच्यात खूपच समानता आहे, आणि त्यामुळेच राज्यांची स्वायत्तता आणि प्रांतिक अस्मिता यांचं महत्व तुम्ही नक्कीच समजू शकता. राज्यांच्या स्वायत्ततेसाठीचा आग्रही आवाज तुम्ही बनाल आणि सर्वसामावेशक भूमिका घेत पश्चिम बंगालचा विकास साधाल अशी आशा मी व्यक्त करतो,” असं राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबतच राज ठाकरे यांनी DMK पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांचं देखील अभिनंदन केलं आहे.

- Advertisement -

तामिळनाडूमध्ये DMK ने सत्ताधारी AIADMK चा पराभव केला आहे. याचं अभिनंदन राज ठाकरे यांनी केलं आहे. “तामिळनाडू विधानसभेत स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली डीएमके पक्षाने मिळवलेल्या विजयासाठी स्टॅलिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन. भाषिक आणि प्रांतिक अस्मितेच्या राजकारणाला करुणानिधींनी कायमच प्राधान्य दिलं, हिच भूमिका तुम्ही देखील तितक्याच निष्ठेने पुढे न्याल आणि काही बाबतीत राज्यांच्या स्वायत्तेबद्दल आग्रही रहाल अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन,” असं राज ठाकरे यांनी स्टॅलिन यांचं अभिनंदन करताना म्हटलं आहे.

- Advertisement -

- Advertisement -