नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी असो किंवा प्रभू श्रीरामाच्या जनमस्थळाबद्दलचे वक्तव्य असो विविध विधाने करून कायम वादाच्या भोवऱ्यात सापडणारे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी आता नवा वाद निर्माण केला आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत आला असून त्यांच्याकडून ही अपेक्षा नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तर, भाजपाच्या अमित मालवीय यांनी मणिशंकर अय्यर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Rajiv Gandhi: Mani Shankar Aiyar’s statement puts Congress in trouble)
एका मुलाखतीमध्ये मणिशंकर अय्यर यांनी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या शिक्षणाबाबत टिप्पणी केली आहे. जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान झाले, तेव्हा मला प्रश्न पडला की एअरलाइन पायलट असलेला आणि दोनदा अपयशी ठरलेला माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो? मी त्यांच्यासोबत केम्ब्रिजमध्ये शिकलो, जिथे ते नापास झाले होते. केम्ब्रिजमध्ये नापास होणे खूप कठीण आहे. तिथे फर्स्ट क्लास मिळवणे सोपे आहे. कारण आपली प्रतिमा विद्यापीठाला जपायची आहे आणि किमान प्रत्येकजण उत्तीर्ण व्हावा, यासाठी ते प्रयत्नशील असते. त्यानंतर ते लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमध्ये गेले, तिथेही ते नापास झाले. ही व्यक्ती पंतप्रधान कशी होऊ शकते, असे ते म्हणाले.
Rajiv Gandhi struggled academically, even failing at Cambridge, where passing is relatively easy. He then moved to Imperial College London but failed there as well…
Many questioned how someone with his academic record could become the Prime Minister.
Let the veil be stripped. pic.twitter.com/m9serSGQMs
— Amit Malviya (@amitmalviya) March 5, 2025
काँग्रेसची तीव्र प्रतिक्रिया
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या विधानावर, माजी केंद्रीय मंत्री पवन बन्सल यांनी तीव्र प्रतिक्रिया देताना हे हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. मी त्यांचे वक्तव्य ऐकलेले नाही. त्यांनी हे विधान केले असेल तर ते चुकीचे आहे. राजीव गांधी हे देशाचे एक महान नेते होते. त्यांनी फार कमी वेळात प्रसिद्धी मिळवली. ते परदेशात गेल्यावर त्यांचा आदर केला जात असे. अय्यर हे राजीव गांधी यांच्यासोबत असत, त्यांच्यासोबत काम करत होते. एकेकाळी ते स्वतःला राजीव गांधी यांचे निकटवर्ती म्हणवून घेण्यास अभिमान बाळगत असत. त्यांच्याकडून अशा प्रकारची टिप्पणी अपेक्षित नाही. राजीव गांधी यांनी देशासाठी कसा पुढाकार घेतला आणि त्या सर्वांमध्ये ते कसे यशस्वी झाले, हे जगाला माहिती आहे, असे पवन बन्सल म्हणाले.
थेट मोदींशी तुलना
यासंदर्भात काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अमित मालवीय यांना गोष्टी एडिट करण्याची सवय आहे. यामध्ये किती बरोबर आहे आणि किती चूक आहे, हे फक्त मणिशंकर अय्यरच सांगू शकतात. पण राजीव गांधी उत्तीर्ण झाले की अनुत्तीर्ण झाले, हा प्रश्न नाही. पंतप्रधान म्हणून राजीव गांधी कसे होते? पंतप्रधान झाल्यानंतर राजीव गांधी यांनी कोणत्या प्रकारचे काम केले? तुम्हाला राजीव गांधी यांचे विश्लेषण करायचे असेल तर तुम्हाला त्यांच्या कामाचे विश्लेषण करावे लागेल, असे ते म्हणाले. भाजपाचे लोक पंतप्रधान मोदी यांची पदवी दाखवायलाही तयार नाहीत. आपण चहा विकत होतो आणि मॅट्रिक पास आहोत, असे पंतप्रधान स्वतः सांगतात. पण त्यांच्या शिक्षण किती हे पाहून त्यांच्याकडे पाहात नाही. पंतप्रधान म्हणून त्यांची कामगिरी पाहतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
हेही वाचा – Eknath Khadse : शाळांसाठी पैसे नाहीत, मग कशाच्या जोरावर घोषणा जाहीर करता? खडसे संतापले