राहुल गांधींच्या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ, राजनाथ सिंह आणि पीयूष गोयल आक्रमक

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपल्या लंडन दौऱ्यात केलेल्या वक्तव्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. भाजपाच्या खासदारांच्या निशाण्यावर राहुल गांधी होते. त्यांनी देशवासीयांची आणि सभागृहाची माफी मागावी, अशी एकमुखी मागणी सर्वांनी केली. या मुद्द्यावरून लोकसभेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तर, राज्यसभेत केंद्रीय वाणिज्‍य और उद्योगमंत्री पीयूष गोयल हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावळी झालेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

याच लोकसभेचे सदस्य असलेल्या राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारताचा अपमान केला आहे. त्यांच्या विधानाचा या सभागृहातील सर्व सदस्यांनी निषेध केला पाहिजे आणि त्यांना सभागृहामध्ये माफी मागण्यास सांगितले पाहिजे, अशी माझी मागणी असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही राहुल गांधींवर जोरदार टीका केली. खासदारांना संसदेत बोलू दिले जात नसल्याचे लंडनमध्ये राहुल गांधी म्हणाले. हा तर लोकसभेचा अपमान आहे. या वक्तव्यावर सभागृह अध्यक्षांनी त्यांच्यावर कारवाई करायला हवी. आमच्या लोकशाहीचा अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, असे गिरीराज सिंह म्हणाले.

राज्यसभेत भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे प्रमुख नेते आहेत. परदेशात जाऊन त्यांनी भारतीय लोकशाहीवर केलेली टीका ही लज्जास्पद आहे. त्यांनी भारतातील जनतेचा आणि संसद सदस्यांचा अपमान केला आहे. भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि खासदार संसदेत बोलू शकतात. राहुल गांधींनी संसदेची माफी मागितली पाहिजे. राहुल गांधींनी संसदेत येऊन देशातील जनतेची आणि सभागृहाची माफी मागावी, अशी आमची मागणी असल्याचे गोयल म्हणाले. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.