घरदेश-विदेशआण्विक पर्यायाचा अवलंब करू नये, राजनाथ सिंह यांचे रशियाच्या संरक्षणमंत्र्यांना आवाहन

आण्विक पर्यायाचा अवलंब करू नये, राजनाथ सिंह यांचे रशियाच्या संरक्षणमंत्र्यांना आवाहन

Subscribe

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून धुमश्चक्री सुरू आहे. आता तर त्यांच्यातील युद्ध अधिकच तीव्र झाले आहे. या पार्श्वभूमीवर कायम विश्वशांतीचा पुरस्कार करणाऱ्या भारताने यातून शांततामय मार्ग काढण्याचे आवाहन उभय देशांना केले आहे. कोणत्याही परिस्थितीत आण्विक पर्यायाचा अवंलब करू नये, असे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की या दोघांनीही ताठर भूमिका घेतली आहे. त्यामुळे उभय देशांकडून युद्ध थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीत. तथापि, दोन्ही देश मुत्सद्देगिरीचा भाग म्हणून विविध देशांशी संपर्क साधत आहेत. रशियाने अलिकडेच नाटोच्या सदस्य देशांसोबत चर्चा केली आहे. त्याच अनुषंगाने रशियाचे रक्षणमंत्री सर्गेई शोइगु यांच्या विनंतीनुसार भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज, बुधवारी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्य तसेच युक्रेनमधील बिघडलेल्या परिस्थितीवर चर्चा केली.

- Advertisement -

रशियाचे संरक्षणमंत्री शोईगु यांनी राजनाथ सिंह यांना युक्रेनमधील परिस्थितीची माहिती दिली. ‘डर्टी बॉम्ब’च्या संभाव्य वापरासंदर्भात युक्रेनकडून देण्यात आलेल्या चिथावणीबाबत रशियाने चिंता व्यक्त केली. यूक्रेन ‘डर्टी बॉम्ब’चा वापर करू शकतो, असा दावा रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी यापूर्वीच केला आहे. ‘डर्टी बॉम्ब’मध्ये किरणोत्सर्गी पदार्थांसोबत स्फोटकांचा वापर केला जातो.

राजनाथ सिंह यांनी संघर्षाच्या त्वरित निराकरणासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबण्याच्या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. आण्विक शस्त्रे वापरणे हे मानवतेच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध असल्याने आण्विक पर्यायाचा कोणत्याही बाजूने अवलंब करू नये, असे आवाहन राजनाथसिंह यांनी यावेळी केले. दोन्ही मंत्र्यांनी यावेळी एकमेकांच्या संपर्कात राहण्याबाबत सहमती व्यक्त केली.

- Advertisement -

भारताकडून शांततापूर्ण चर्चेचा सल्ला
रशिया आणि युक्रेन युद्धाबाबत भारताने नेहमीच आपली भूमिका स्पष्ट ठेवली आहे. दोन्ही देशांना भारताने नेहमीच शांततेने चर्चेचा करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र अलीकडेच रशियाने युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यावर देखील भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी ते रशियाने युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत म्हणाले की, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे आणि नागरिकांचा बळी घेणे हे योग्य नाही. या संघर्षातून कोणाचाही फायदा होणार नाही. हा संघर्ष जगाच्या मोठ्या भागाला हानी पोहोचवत आहे, कारण त्याचा लोकांच्या दैनंदिन जीवनावर वाईट परिणाम होत आहे. हा वाद सोडवण्यासाठी रशिया आणि युक्रेनला राजनैतिक आणि संवादाच्या मार्गावर परतावे लागेल, असे परराष्ट्रमंत्र्यांनी नुकतेच सांगितले होते. मंत्री जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियातील लोवी इन्स्टिट्यूटमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना हे वक्तव्य केले होते.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -