घरताज्या घडामोडीदिल्लीत गोंधळ; राज्यसभेतल्या राड्याने व्यथित होऊन उपसभापतीच उपोषणावर!

दिल्लीत गोंधळ; राज्यसभेतल्या राड्याने व्यथित होऊन उपसभापतीच उपोषणावर!

Subscribe

गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीतलं वातावरण राज्यसभेत झालेल्या अभूतपूर्व राड्यामुळे ढवळून निघालं आहे. केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या कृषीविषयक विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस सदस्यांनी रविवारी राज्यसभेत गोंधळ घातला. काही सदस्यांनी अध्यक्षांच्या समोर जाऊन जोरजोरात घोषणाबाजी केली. विधेयकाचा मसुदा फाडण्यात आला. शिवाय, काहींनी थेट उपसभापतींचा माईकच पळवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर संबंधित कृषीविषयक विधेयकावर जशी चर्चा सुरू झाली आहे, तशीच काँग्रेस खासदारांनी घातलेल्या गोंधळावर देखील चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपकडून काँग्रेसला लक्ष्य केलं जात असतानाच काँग्रेस सदस्यांनी विधेयकाला विरोध दर्शवत संसदेच्या उर्वरित कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता ज्यांच्यासमोर हा सगळा गोंधळ झाला, ते राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनीच एक दिवसाच्या उपोषणावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातलं सविस्तर निवेदन त्यांनी भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध सभापती व्यंकय्या नायडू यांना दिलं आहे.

रात्रभर झोपू नाही शकलो!

राज्यसभेत झालेल्या गोंधळानंतर गेल्या दोन दिवसांपासून मला प्रचंड मनस्ताप होत असल्याचं हरिवंश यांनी व्यंकय्या नायडूंना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. शिवाय, या ताणामुळे गेल्या २ दिवसांपासून मी झोपू शकलो नाही असं देखील त्यात म्हटलं आहे. २० सप्टेंबर रोजी राज्यसभेत जे झालं, त्यामुळे सभागृह आणि सभापतींची खुर्ची यांच्या सन्मानाला धक्का बसला आहे. लोकशाहीच्या नावावर सभासदांकडून हिंसक वर्तन झालं. इतर सदस्यांना घबरवण्याचा प्रकार झाला. नियमपुस्तिका फाडून माझ्यावर फेकण्यात आली. गेल्याच आठवड्यात माझी पुन्हा उपसभापती पदी निवड करण्यात आली होती. पण एका आठवड्यातच मला असा कडवट अनुभव येईल याची मी कल्पना नव्हती केली. त्यामुळे मी २४ तासांचा उपवास करत आहे. यादरम्यान मी राज्यसभेच्या कामकाजामध्ये नियमित पद्धतीने सहभागी होईन’, असं या पत्रात हरिवंश यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -