घरताज्या घडामोडीराज्यसभा निवडणुकीत कोणाचा जय, कोणाचा पराजय

राज्यसभा निवडणुकीत कोणाचा जय, कोणाचा पराजय

Subscribe

मतदानानंतर त्याचे सर्वच राजकीय पक्षात तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे नाटयही रात्री उशीरापर्यंत रंगले. अखेर चार पैकी तीन राज्यांमध्ये भाजपचा विजय झाला. तर काँग्रेसला राजस्थानमध्ये यश मिळाले.

राज्यसभेच्या १६ जागांसाठी शुक्रवारी महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये मतदान झाले. मात्र मतदानावेळी अनेक नाटयमय घडामोडी झाल्याने मतदानानंतर त्याचे सर्वच राजकीय पक्षात तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे नाटयही रात्री उशीरापर्यंत रंगले. अखेर चार पैकी तीन राज्यांमध्ये भाजपचा विजय झाला. तर काँग्रेसला राजस्थानमध्ये यश मिळाले.

राजस्थान, हरियाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात राज्यसभेच्या १६ जागांसाठी १० जूनला मतदान पार पडले. मात्र महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये मतदानावेळी काही राजकीय पक्षांनी विरोधी पक्षातील काही आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. यामुळे मतमोजणीचा पुरता खोळंबा झाला होता. रात्री उशीरा निवडणूक आयोगाने मतमोजणीस परवानगी दिली. त्यानंतर राज्यसभेच्या निवडणुकीचे निकाल हाती लागले. दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शनिवारी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या पराभवानंतर थेट भाजप आणि निवडणूक आयोग यांच्यात साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप केला.

- Advertisement -

शिवसेनेकडून निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रश्नचिन्ह

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव हा भाजप आणि निवडणुक आयोगाच्या मिलीभगतमुळे झाल्याचा आरोप केला आहे. तसेच सुहास कांदेचे मत बाद ठरवल्याप्रकरणी निवडणूक आय़ोगाने भाजपचे समर्थन केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की निवडणूक आयोगाने आमचे एक मत अमान्य केलं. आम्ही दोन मतांना विरोध दर्शवला होता पण त्यावर मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यावरूनच निवडणूक आयोग भाजपच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे हरियाणामध्येही राज्यसभा निवडणूकीत नाट्यमय घटना घडल्याचे पाहायला मिळाले. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी विजयानंतर पहाटे ३.५० वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी आपल्याला फार आनंद होत असून कृष्ण लाल पंवार आणि कार्तिकेय शर्माला विजय मिळवून देणाऱ्या सर्व आमदारांचे आपण आभारी आहोत असे सांगितले.

यावेळी मतमोजणी मागच्या गणिताबद्दल बोलताना ते म्हणाले कि भाजपकडे ४० आमदार , काँग्रेसचे ३१ आमदार, जजपाचे १० आमदार, अपक्ष आणि इतर पक्षाचे उमेदवार होते. त्यातील एका उमेदवाराने मतदान केले नाही तर काँग्रेसच्या एका आमदाराचे मतच रद्द झाले. आमच्या उमेदवाराने मात्र विजय मिळवला. पण काँग्रेस उमेदवाराला मात्र अवघी २९ मत मिळाली. आमदारांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले होते. आमचे पहीले मानांकित मत ३६ होते. तर पंवार यांना २९. ३४ मतांची गरज होती. तर कार्तिकेय शर्मा यांना ६.६६ मत स्थानांतरित करण्यात आल्याचे खट्टर यांनी यावेळी सांगितले. तसेच पराजयाच्या भीतिनेच काँग्रेसने मतांच्या पुर्नमोजणीची मागणी केली होती.

तर दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीवर बोलताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार म्हणाले की निवडणुकीचे निकाल बघून मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. कारण काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीला कोट्याप्रमाणेच मत देण्यात आली आहेत. तसेच पवार यांनी चमत्कार घडण्यामागे देवेंद्र फडणवीस असल्याचे सांगितले. अपक्ष उमेदवारांना आपल्या बाजूने वळवण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळेच सगळी गणित बदलली. पण यामुळे स्थिर सरकारला काहीही फरक पडणार नसल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.

भाजप आणि महाविकास आघाडीला ३-३ जागा

महाराष्ट्रात ६ जागांपैकी भाजपने ३ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना , काँग्रेस आणि एनसीपीने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. शिवसेनेचे संजय पंवार पराभूत झाले आहेत. तर राजस्थानमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठीच्या अटीतटीच्या सामन्यात काँग्रेसने तीन आणि भाजपने एक जागा जिंकली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -