Homeदेश-विदेशRamdas Athawale : डॉ. आंबेडकरांवरील विधानावरून विरोधकांनी शहांना घेरले, रामदास आठवले काय...

Ramdas Athawale : डॉ. आंबेडकरांवरील विधानावरून विरोधकांनी शहांना घेरले, रामदास आठवले काय म्हणाले

Subscribe

सरकार आणि अमित शहांवर टीका होत असतानाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मात्र कॉंग्रेसवर टीका केली आहे. याबाबतीत काहीही बोलण्याचा अधिकार कॉंग्रेसला नाही, असे आठवले म्हणाले.

नवी दिल्ली : राज्यघटनेचे जनक डॉ. आंबेडकर यांच्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या विधानावरून विरोधकांनी चांगलेच रान उठवले आहे. अमित शहांनी या वक्तव्याबाबत माफी मागावी असे सांगत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (ramdas athawale attacks opposition over amit shah on ambedkar)

‘भारतीय राज्यघटनेचा 75 वर्षांचा गौरवशाली इतिहास’ या विषयावर मंगळवारी चर्चा झाली. या चर्चेत विरोधकांवर तोंडसुख घेत शहा म्हणाले, ‘आंबेडकर… आंबेडकर… आंबेडकर… असे बोलण्याची आता फॅशन झाली आहे. एवढ्या वेळा देवाचे नाव घेतले असते तर सात जन्म स्वर्गात गेले असते.’ शहा यांच्या या विधानावरून विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. कॉंग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी लोकसभा तसेच राज्यसभेत देखील या मुद्द्यावरून गोंधळ घातला. यासोबतच संसदेच्या बाहेर देखील निदर्शने करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील यासंदर्भात एक पत्रकार परिषद घेत आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगितले.

हेही वाचा – Amit Shah On Dr. Ambedkar : आमची नव्हे कॉंग्रेसचीच भूमिका आंबेडकर विरोधी; शहांनी दिले कायदेशीर कारवाईचे संकेत

दरम्यान, सगळीकडून सरकार आणि अमित शहांवर टीका होत असतानाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मात्र कॉंग्रेसवर टीका केली आहे. याबाबतीत काहीही बोलण्याचा अधिकार कॉंग्रेसला नाही, असे आठवले म्हणाले.

सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले म्हणाले की, राज्यघटनेवरील चर्चेला जेव्हा अमित शहा उत्तर देत होते, तेव्हाच त्यांनी याचा उल्लेख केला होता. अमित शहा यांच्या म्हणण्याचा अर्थ होता की, कॉंग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वेळा हरवले होते. कॉंग्रेसमुळेच त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. बाबासाहेबांचा अपमान यांनीच केला होता, असेही आठवले म्हणाले. मात्र, तरीही ते आंबेडकर – आंबेडकर करत असतात. उलट बाबासाहेबांबद्दल अमित शहा यांना खूप आदर आहे. बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला उत्तर देण्याचे काम त्यांनी केले आहे, असेही आठवले म्हणाले.

दरम्यान, कॉंग्रेसच्या आरोपांना उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, कॉंग्रेसने सावरकरांचा देखील अपमान केला. तसेच आणीबाणी लादून कॉंग्रेसने राज्यघटनेच्या सगळ्याच मूल्यांना तिलांजली दिल्याचे देखील ते म्हणाले.

हेही वाचा – Aaditya Thackeray : करोडो लोकांना सन्मान देणाऱ्या महामानवाबद्दल किती हा द्वेष; ठाकरेंची भाजपवर टीका

कॉंग्रेसने पुन्हा एकदा आपला जुनाच फंडा अवलंबला असल्याचा आरोपही अमित शहा यांनी केला. कोणतेही सत्य तोडून – मोडून सांगायचे आणि एखादी खरी गोष्ट देखील खोटी असल्याचे भासवायचे, हा त्यांचा नेहमीचा कुत्सित प्रयत्न असल्याचे शहा म्हणाले. संसदेतील चर्चेत हे सिद्ध झाले आहे की, बाबासाहेब आंबेडकरांना कॉंग्रेसनेच कशापद्धतीने विरोध केला होता. त्यांच्या निधनानंतरही त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्यावर अन्याय केला, याचीही माहिती त्यांनी दिली.

मी अशा पक्षातून आहे जो पक्ष आंबेडकरांचा कधीच अपमान करत नाही. आधी जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षाने कायमच आंबेडकरांचे सिद्धांत पाळण्याचे काम केले आहे. जेव्हा – केव्हा भाजप सत्तेत आली आहे, तेव्हा त्यांनी आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार केला. तसेच भाजपमुळेच आरक्षण मजबूत झाल्याचेही ते म्हणाले.


Edited by : Ashwini A. Bhatavdekar