Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशEknath Shinde : "भाजप 'CM'पद सोडणार नाही, शिंदे नाराज आहेत, त्यांनी उपमुख्यमंत्री...

Eknath Shinde : “भाजप ‘CM’पद सोडणार नाही, शिंदे नाराज आहेत, त्यांनी उपमुख्यमंत्री व्हावं, नाहीतर…”, केंद्रीय मंत्र्यांनं रोखठोकच सांगितलं

Subscribe

Eknath Shinde Vs Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यातच केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या विधानानंतर चर्चांना उधाण आलं आहे.

महायुतीत सत्तेत आल्यानंतर ‘मुख्यमंत्रि’पदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असा कयास बांधला जात आहे. तर, एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं बोललं जात आहे. यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिंदेंनी दोन पावले मागे आले पाहिजेत, असं विधान केलं आहे.

एकनाथ शिंदे नाराज असल्याचंही रामदास आठवले यांनी सांगितलं आहे. तसेच, शिंदेंनी उपमुख्यमंत्री बनावं नाहीतर केंद्रात यावे, असंही आठवलेंनी म्हटलं. ते दिल्लीत संसदेबाहेर ‘एएनआय’शी संवाद साधत होते.

- Advertisement -

रामदास आठवले म्हणाले, “महाराष्ट्रात सुरू असलेला वाद थांबला पाहिजे. एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं आहे. आता शिवसेनेच्या 57 जागा निवडून आल्या आहेत. भाजपचे 132 आमदार निवडून आले आहेत. अडीच वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिल्यानं आता देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली पाहिजे. फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठांनी घेतला आहे.

- Advertisement -

“एकनाथ शिंदे नाराज आहेत. त्यांनी नाराजी दूर केली पाहिजे. शिंदेंबाबत महाराष्ट्राला आदर असून त्यांनी विकासात्मक कामे केली आहेत. भाजपकडे जास्त जागा असल्यानं ते मुख्यमंत्रिपद सोडणार नाहीत. फडणवीस चार पावले मागे आले होते, तसे शिंदे यांनी दोन पावले मागे आले पाहिजे. शिंदे यांनी एकतर उपमुख्यमंत्री बनलं पाहिजे. उपमुख्यमंत्री बनायचं नसेल, तर त्यांनी केंद्रात यावं. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा विचार करतील,” असं आठवले यांनी रोखठोख सांगितलं.

“शिंदेंनी नाराज होणे चांगली गोष्ट नाही. त्यांच्या 57 आमदारांची आम्हाला गरज आहे. महायुती म्हणून एकत्र जायला पाहिजे. जनतेनं आपल्यावर विश्वास ठेवला होता. नाहीतर जनतेचा विश्वास तुटून जाईल. लवकरात लवकर मुख्यमंत्रिपदावर निर्णय व्हायला पाहिजे. मंत्रिमंडळात माझ्या पक्षाला एक मंत्रीपद मिळालं पाहिजे, अशी मागणी मी केली होती. त्याबद्दल आश्वासन मिळालं आहे,” अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -