झारखंडमध्ये पिकअप व्हॅनने महिला पोलीस अधिकाऱ्याला चिरडले

हरियाणातील ही घटना ताजी असतानाच आता झारखंडमधील रांची जिल्ह्यात वाहन तपासणीदरम्यान पिकअप व्हॅनने एका महिला इन्स्पेक्टरची चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हरियाणातील नूह जिल्ह्यात अवैध दगड खाणकामाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) यांना डंपरने चिरडून ठार केले. हरियाणातील ही घटना ताजी असतानाच आता झारखंडमधील रांची जिल्ह्यात वाहन तपासणीदरम्यान पिकअप व्हॅनने एका महिला इन्स्पेक्टरची चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संध्या टोपनो असे या मृत महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. (Ranchi female police sub inspector crushed to death by a pickup van)

रांची जिल्ह्यातील तुपुदाना परिसरात ही घटना घडली आहे. पिकअप व्हॅनने महिलेला जोरदार धडक दिल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पीकअप व्हॅनच्या चालकाला तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केल्याचे समजते.

बुधवारी पहाटे ३ वाजता सुमारास गस्तीवर असताना संध्या टोपनो वाहनांची तपासणी करत होत्या. या तपासणीवेळी महिला पोलीस अधिकारी संध्या टोपनो यांनी पिकअप व्हॅनला थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने वाहनाचा वेग वाढवत महिला निरीक्षकाला उडवलं. त्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी आरोपी पिकअप व्हॅनचा चालक वाहनासह पळून जाण्यात यशस्वी झाला.

याप्रकरणी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला अटक करून वाहन जप्त केल्याची पुष्टी केली आहे.

रांचीचे एसएसपी कौशल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना या परिसरातून प्राणी तस्करांची जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारे रस्त्यावर चेकिंग पॉइंट बसवण्यात आला. दरम्यान, एका पिकअप व्हॅन चालकाने महिला एसआयला वाहनाने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला.

याआधीही झारखंडच्या धनबादमध्ये ऑटोचालकांनी न्यायाधीश उत्तम कुमार यांची धडक मारून हत्या केली होती. मॉर्निंग वॉकवरून ते आपल्या राहत्या घरी परतत असताना ही घटना घडली.


हेही वाचा – 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणात ठाकरेंकडून कोर्टात कोणतंही उत्तर नाही, अधिकची वेळ मागण्याची शक्यता