रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती, १३४ मतांनी विजयी

श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची राष्ट्रपतीपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. रानिल विक्रमसिंघे यांना निवडणुकीत १३४ मतं मिळाली असून त्यांचा विजय झाला आहे. नव्या राष्ट्रपतीसाठी निवडणुकीसाठी संसदेत हजेरी देखील लावली होती. त्याचप्रमाणे श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी देखील संसदेत हजेरी लावली होती. यावेळी संसदेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

रानिल विक्रमसिंघे हे श्रीलंकेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल श्रीलंकेला फार आदर आहे. गेल्या काही काळात गोतबाया राजपक्षे आणि त्यांचे भाऊ माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्यावर अविश्वास ठेवण्यात आला होता. त्यामुळे राजपक्षे बंधूंनी राजीनामा दिला होता. गोतबाया यांनी देश सोडून जाणं पसंत केलं. ते देश सोडून पहिल्यांदा मालदीवला गेले. त्यानंतर ते सिंगापूर गेल्याचं सांगण्यात आलं होतं. देशात आणीबाणी जरी लागू करण्यात आली असली तरी देखील आज राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली. श्रीलंकेच्या लोकसभेत २२५ खासदार आहेत. गुप्त मतदान पद्धतीने ही निवडणूक पार पडली. यामध्ये राजपक्षे यांच्या एसएलपीपी या पक्षाने विक्रमसिंघे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे ते देशाचे राष्ट्रपती बनले असून पुढील कार्यभार संभाळणार आहेत.

विक्रमसिंघे यांचा निषेध

राष्ट्रपती निवडीसाठी संसदेत मतदान होत असताना दुसरीकडे कोलंबोतील राष्ट्रपती सचिवालयात कार्यवाहक अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्या विरोधात जनतेची मूक निदर्शने सुरू आहेत.

मागील काही दिवसांपासून श्रीलंकेत आर्थिक संकट निर्माण झालं असून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. येथील नागरिकांनी राष्ट्रपती भवनावरच ताबा मिळवला. तसेच देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. श्रीलंकेत सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याच्या निर्णयानंतर लगेचच निवडणुका जाहीर झाल्या होत्या. आज राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली असून विक्रमसिंघे यांचा विजय झाला आहे.


हेही वाचा : श्रीलंकेत जनता महागाईने त्रस्त, पंतप्रधानांच्या निवासस्थानी आंदोलक कॅरम खेळण्यात व्यस्त