घरताज्या घडामोडीBharatRatna : पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपतींचा अपमान; भारतरत्न देताना द्रौपदी मुर्मू उभ्या अन्...

BharatRatna : पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपतींचा अपमान; भारतरत्न देताना द्रौपदी मुर्मू उभ्या अन् मोदी खुर्चीवर बसून

Subscribe

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपला भारतीय संविधान संपवायचे आहे. त्यांना नागपूरचा कायदा देशावर लागू करायचा आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा अजेंडा राबवायचा आहे. याचे उदाहरण वेळोवेळी पाहायला मिळत आहे. राष्ट्रपती मुर्मू या उभे राहून लालकृष्ण अडवाणींचा सन्मान करतात आणि मोदी खुर्चीवर बसून राहतात, असे सांगत राष्ट्रपतींचा मोदी वेळोवेळी अपमान करत असल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केला. दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित इंडिया आघाडीच्या संविधान बचाव रॅलीमध्ये ते बोलत होते. यावेळी मंचावर काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार, तुरुंगा कैद असलेले अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन, आपचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव उपस्थित होते.

ईव्हीएम सेटिंग झालेलं आहे का? तेजस्वी यादवांचा सवाल

भाजप घोषणा देत आहे की आम्ही चारशे पार जाणार, त्यांचे तोंड आहे ते काहीही बोलू शकतात. मात्र ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये जनता मालक असते. ही जनता ठरवणार आहे की दिल्लीमध्ये कोणाचे शासन आगामी काळात चालणार आहे. त्यांची घोषणा आहे की अब की बार चारसो पार. त्यांच्या घोषणेवरुन असे वाटत आहे की पहिल्यापासूनच ईव्हीएम सेटिंग झालेलं आहे, असा टोला तेजस्वी यादव यांनी भाजपाला लगावला.

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मौन, मोदींची बिल गेट्सला मुलाखत

तेजस्वी यादव यांनी रामलीला मैदानावर उपस्थित जनतेला उद्देशून म्हटले की, हात उंचावून सांगा भाजपला सत्तेतून बेदखल करायचे आहे की नाही? त्यावर उपस्थितांनी हात उंचावून त्यांना प्रतिसाद दिला. तेजस्वी यादव म्हणाले की, देशात अघोषित आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे. सत्तेत बसलेले लोक घमेंडी झालेले आहे. हुकूमशहा प्रमाणे ते वागत आहेत. विरोधी पक्षाला जे दिसत आहे ते सांगणे आमचे कर्तव्य असल्याचे सांगत तेजस्वी यादव म्हणाले, आज देशाचे सर्वात मोठे दुष्मन कोणी असेल तर बेरोजगारी, महागाई, गरीबी आहे. उपस्थित तरुणांना आवाहन करुन तेजस्वी यादव म्हणाले, मोदींनी गेल्या दहा वर्षात नोकरी दिलेल्या एका तरी तरुणाने हात उंचावून दाखवावा? मोदींनी गेल्या दहा वर्षात सर्व सरकारी संस्थांचे खासगीकरण केले. मात्र त्याचवेळी बिहारमध्ये जेव्हा आमचे 17 महिन्यांचे  सरकार होते तेव्हा पाच लाख तरुणांना नोकरी दिली. मोदींच्या काळात शेतकरी त्रस्त आहे. तरुण बेरोजगार आहे. शेतकऱ्यांना भेटायला त्यांना वेळ नाही. ते प्रियंका चोपडाला भेटतील. मागच्या निवडणुकीत अक्षय कुमारला मुलाखत दिली होती. यंदा त्यांनी बिल गेट्सला निमंत्रित करुन मुलाखत देण्याचे काम केले. मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवणार हे सांगत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. त्याचे काय झाले, असा सवाल तेजस्वी यादव यांनी उपस्थित केला.

पिंजऱ्यात वाघालाच टाकले जाते

मोदींच्या पार्टीमध्ये विविध सेल आहेत, त्यामध्ये ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आहे. आरजेडीचे नेते लालू यादव यांना तुरुंगात टाकले. राबडी देवीपासून माझ्या बहिणींच्या घरांवर छापेमारी करण्यात आली. कुठे ईडीचा छापा तर कुठे आयटीचा छापा पडत आहे. पण या छापेमारीला आम्ही घाबरत नाही. भाजपने आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडेचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकले आहे. पण त्यांच्या या कारवायांना आणि धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. आम्ही संघर्ष करत राहणार, कारण पिंजऱ्यात वाघालाच टाकले जाते, हेही त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा तेजस्वी यादवांनी भाजपला दिला.

- Advertisement -

कंसाचे उदाहरण देत तेजस्वी यादव म्हणाले, कंस ज्यांना ज्यांना घाबरत होता त्यांना तुरुंगात टाकत होता. मोदी किती जणांना तुरुंगात टाकणार आहेत? असा सवाल तेजस्वी यादव यांनी केला.

हेही वाचा : Ramlila Maidan : एक व्यक्ती-एक पक्षाचे सरकार घालवण्याची वेळ आली; रामलीला मैदानावरुन उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

भाजप खोट्या लोकांचा पक्ष

जनतेकडे मताची ताकद आहे. जनतेने मताचा एक धक्का दिला तर मोदींना हात मळत बसावे लागणार आहे, असे सांगत जनतेने मताच्या अधिकाराचा वापर करण्याचे आवाहन तेजस्वी यादव यांनी केले. भाजप खोटारड्यांचा पक्ष आहे. ते यूरियाला साखर बनवू शकतात. शेणाला हलवा म्हणून तुम्हाला देतील. तुमचेच डोळे फोडून तुम्हाला चष्मा देतील, आणि त्यावर म्हणतील आम्ही तुम्हाला चष्मा दिला. हा खोट्या लोकांचा पक्ष आहे, त्यामुळे भाजपच्या लोकांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन तेजस्वी यादव यांनी केले.

मोदींची गॅरंटी चायनीज माल – तेजस्वी यादव

मोदी गॅरंटीवर हल्लाबोल करताना तेजस्वी यादव म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणतात की त्यांची गॅरंटी, ही मजबूत गॅरंटी आहे. मात्र मोदींची गॅरंटी हा चायनीज माल आहे. दोन-चारवेळा वापर केला की गॅरंटी संपून जाते. त्यामुळे जोपर्यंत निवडणुका आहेत तोपर्यंत मोदींची गॅरंटी आहे. दोन कोटींच्या रोजगाराचे काय झाले? पंधरा-पंधरा लाख रुपयांचे काय झाले? असा सवाल तेजस्वी यादव यांनी केला. या प्रश्नांची उत्तरं भाजपचे लोक देणार नाही, उलट प्रोपागेंडा करणार आणि लोकांची दिशाभूल करतील.

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान

आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केला. अडवाणी यांच्या निवासस्थानी हा सोहळा झाला. राष्ट्रपती मुर्मू या उभं राहून अडवाणींना सन्मानित करत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी अडवाणींच्या बाजूला बसून आहेत. राष्ट्रपती या उभे राहून अडवाणींना सन्मानित करत आहेत मात्र मोदी त्यांच्या सन्मानात उभे देखील राहिले नाही, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला. याआधीही राष्ट्रपती मागे चालत आहेत आणि मोदी त्यांच्या पुढे चालत आहेत, असे दृष्य या देशाने पाहिले आहे, असे सांगत तेजस्वी यादव म्हणाले, या लोकांचा संविधानावर विश्वास नाही. यांना नागपूरचा कायदा देशावर लागू करायचा आहे. आरएसएसचा अजेंडा त्यांना देशात लागू करायचा आहे, असा हल्लाबोल तेजस्वी यादव यांनी केला.

जागतिक संस्थेने भारतात केलेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी सादर करत देशातील बेरोजगारीचा दर किती वाढला आहे, याची माहिती तेजस्वी यादव यांनी त्यांच्या भाषणातून देत मोदी सरकार यावर काहीही बोलत नाही, असे म्हणत निशाणा साधला. शेवटी गोविंदाच्या चित्रपटातील ‘तुम तो धोकेबाज हो’ या गाण्यातून तेजस्वी यादव यांनी मोदींवर निशाणा साधला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -