2000 नोटवापसी : RBIच्या निर्णयाला दिल्ली हायकोर्टात आव्हान

संग्रहित छायाचित्र

 

नवी दिल्ली: दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या (RBI) निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करुन आव्हान देण्यात आले आहे. RBI चा हा निर्णय मनमानी आहे. दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेणाऱ्यांना ५०० रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

Adv रजनीश गुप्ता यांनी ही जनहित याचिका केली आहे. RBI ने १९ मे २०२३ रोजी अधिसूचना जारी करुन दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहिर केला. ही अधिसूचनाच रद्द करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

स्वच्छ नोट धोरणाचा दाखला देत RBI ने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. स्वच्छ नोट धोरणात फक्त खराब, खोट्या किंवा दुषित नोटा परत घेतल्या जातात. चांगल्या नोटा परत घेतल्या जात नाहीत. नोटा बाद करण्याचा अधिकार RBI ला नाही. हा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद होण्याचे समजताच नागरिकांना एकमेकांकडून दोन हजार रुपयांच्या नोटा घेणे बंद केले आहे. ग्रामीण भागातील नारिकांना याचा नाहक त्रास होत आहे. मुळात व्यवहारातून नोटा बाद करताना एक वर्ष आधी त्याची कल्पना द्यावी लागते. तशी कल्पना दोन हजार रुपयांच्या नोटा बाद करताना देण्यात आलेली नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

दरम्यान, पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी ग्राहक हे 2000 रुपयांची नोट देत असल्याने पेट्रोल पंपावरील रोखीच्या व्यवहारात वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. तर यामुळे पेट्रोल पंपावर ग्राहकांना सुट्टे पैसे देताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत बोलताना ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन या देशातील पेट्रोल पंप डीलर्सच्या सर्वात मोठ्या संघटनेकडून सांगिण्यात आले आहे की, 2000 रुपयांची नोट मागे घेण्याच्या आरबीआयच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा देशभरातील पेट्रोल पंपांवर 2016 च्या नोटाबंदीच्या वेळी जशी परिस्थिती निर्माण झाली होती, तशीच कठीण परिस्थिती आता निर्माण झाली आहे. 100 किंवा 200 रुपयांच्या छोट्या रकमेच्या पेट्रोल डिझेलच्या खरेदीसाठी देखील ग्राहक 2000 रुपयांच्या नोटा देत आहेत.