घरदेश-विदेशNSA अजित डोवाल यांच्या कार्यालयाची दहशतवाद्यांनी केली रेकी

NSA अजित डोवाल यांच्या कार्यालयाची दहशतवाद्यांनी केली रेकी

Subscribe

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जैश ए मोहम्मद संबंधित अटक करण्यात आलेल्या एका दहशतवाद्याने पाकिस्तानी हॅन्डलरच्या सांगण्यावरून अजित डोवाल यांच्या कार्यालयाची रेकी केली असल्याचे त्याने कबूल केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘जैश’शी निगडीत हिदायत उल्लाह मलिक याच्याजवळ डोवाल यांच्या कार्यालयाच्या रेकीचा एक व्हिडिओ समोर आला होता. काश्मीरच्या शोपियाँचा रहिवासी असलेल्या मलिक याला ६ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती.

तर असे सांगितले जात आहे की, गेल्या वर्षी हा रेकी करण्यात आली होती. डोवाल यांच्या कार्यालयाशिवाय श्रीनगरमधील काही भागातील व्हिडिओ शुटिंगदेखील मलिककडे होते. हे व्हिडिओ त्याने थेट पाकिस्तानमध्ये पाठवले होते, या सर्व प्रकारानंतर सुरक्षा एजन्सी अलर्ट झाल्या असल्याची माहिती आहे.

- Advertisement -

यासंबंधी एक एफआयआरही दाखल करण्यात आली आहे. जम्मूच्या गंग्याल पोलीस स्टेशनमध्ये मलिकविरोधात यूएपीएच्या कलम १८ आणि २० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलिक हा जैशच्या लष्कर ए मुस्तफा या गटाचा प्रमुख असून त्याला अनंतनागमधून त्याला अटक करण्यात आली होती.

कोण आहेत डोवाल…

अजित डोवाल हे १९६८ च्या आयपीएस केडरचे अधिकारी आहेत. सैन्याकडून देण्यात येणार्‍या किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलेले ते पहिले पोलिस अधिकारी आहेत. २००५ साली इंटेलिजेंस ब्युरोच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले होते. २०१४ सालच्या निवडणुकांदरम्यान त्यांची भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नेमणूक करण्यात आली होती. १९९९ साली कंधारमध्ये इंडियन एअरलाइनचे आयसी ८१४ विमान अपहरणकर्त्यांकडून अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी अपहरणकर्त्यांबरोबर वाटाघाटी करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.

- Advertisement -

१९८४ मध्ये खलिस्तानी आतंकवादीविरोधात चालवण्यात आलेल्या ऑपरेशन ब्ल्यु स्टारमध्ये देखील त्यांनी महत्वाची भूमिका निभावली, यात ते सीक्रेट एजेंट बनून रिक्षावाल्याच्या पेहराव करून सुवर्ण मंदिरात गेले होते. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकचे नियोजन आणि धोरण ठरवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये तब्बल ३३ वर्ष अधिकारी पदावर जम्मू कश्मीर, पंजाब येथे काम केले आहे. २०१४ पासून ते प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहत आहेत

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -