Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशDelhi CM : रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्यावर त्यांची सासू म्हणते, माझी झोळी आता...

Delhi CM : रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्यावर त्यांची सासू म्हणते, माझी झोळी आता…

Subscribe

रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या सासू मीरा गुप्ता यांना आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांनी म्हटले की, रेखा गुप्ता मुख्यमंत्री झाल्यामुळे मला आनंद झाला आहे. पण लोकांनी मला इतक्या शुभेच्छा दिल्या आहेत की माझी झोळी आता त्या स्वीकारण्यासाठी कमी पडतेय, अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (DUSU) माजी अध्यक्षा आणि पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता आज (20 फेब्रुवारी) दिल्लीच्या नवव्या मुख्यमंत्री बनल्या. दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर झालेल्या एका भव्य समारंभात दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी परवेश वर्मा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या सासू मीरा गुप्ता यांना आनंद गगनात मावेनासा झाला आहे. (Rekha Gupta mother-in-law Meera Gupta reaction after becoming Delhi CM)

रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मीरा गुप्ता यांनी म्हटले की, रेखा घरही सांभाळत होती, समाजही सांभाळत होती. तिने दोन वर्ष संपूर्ण शालिमार सांभाळलं. तिला काम करण्याची सवय आहे. ती मुख्यमंत्री झाल्यामुळे मला आनंद झाला आहे. पण लोकांनी मला इतक्या शुभेच्छा दिल्या आहेत की माझी झोळी आता त्या स्वीकारण्यासाठी कमी पडतेय, अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, बुधवारी (19 फेब्रुवारी) रात्री रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्रीपदासाठी झाल्यावरही मीरा गुप्ता यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटले होते की, मला आता खूप आनंद होत आहे. रेखा राज्यासाठीही चांगलं काम करेल. रेखा गुप्ता समाजासाठी मुख्यमंत्री असेल, पण माझ्यासाठी अजूनही माझी सूनच आहे.

हेही वाचा – Rekha Gupta Delhi CM : रेखा गुप्ता मुख्यमंत्री झाल्यावर काँग्रेस नेत्याची भावूक पोस्ट 

रेखा गुप्ता यांच्या मुलाने काय म्हटले?

रेखा गुप्ता यांच्या मुलाने त्यांच्या कार्यक्षमतेवर दृढ विश्वास व्यक्त केला आहे. निकुंज गुप्ता याने म्हटले की, आम्हाला आईचा आज खूप अभिमान वाटतो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही त्यांना काम करताना आणि त्यांच्यावरचा सगळा ताण पाहिला आहे. आम्हाला ते पाहून कळते की राजकारण किती अवघड गोष्ट आहे. खरंतर त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर हे यश मिळवले आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचा फार अभिमान वाटतो. तसेच मला माझ्या आईवर आणि भाजपा पक्षावर पूर्ण विश्वास आहे, असेही निकुंज गुप्ता याने म्हटले.

दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता कोण?

रेखा गुप्ता यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकली आहे. त्या शालीमार बाग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा 29 हजार 595 मतांनी पराभव केला. त्याच्याबद्दल अधिक सांगायचे तर रेखा गुप्ता या लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) सदस्या आहेत. त्यांनी विद्यार्थीदशेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) द्वारे राजकारणात प्रवेश केला. यानतंर रेखा गुप्ता या 1994-95 मध्ये दौलत राम कॉलेजच्या सचिव म्हणून निवडल्या गेल्या. 1995-96 मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (DUSU) सचिव झाल्या. 1996-97 मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा झाल्या. यानंतर त्यांनी 2003-2004 पर्यंत दिल्लीतील भाजपा युवा मोर्च सचिवपद भूषवले. 2004-2006 मध्ये त्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव होत्या. एप्रिल 2007 मध्ये त्यांनी पहिल्यांदा भाजपाच्या तिकिटावर उत्तर पितमपुरा वॉर्डमधून महापालिकेची निवडणूक लढवली आणि त्या नगरसेवक बनल्या. महानगरपालिकेत नगरसेवक झाल्यानंतर त्यांना 2007-2009 पर्यंत महिला कल्याण आणि बाल विकास समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आली. यानंतर मार्च 2010 मध्ये त्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनल्या. सध्या त्या भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.

हेही वाचा – Eknath Shinde : दिल्लीकरांनी लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री बनवलं, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया