घरदेश-विदेशSabyasachi Mukherjee: गृहमंत्र्यांची FIR ची धमकी, अन् 'सब्यसाची'ने मंगळसूत्राची वादग्रस्त जाहिरात...

Sabyasachi Mukherjee: गृहमंत्र्यांची FIR ची धमकी, अन् ‘सब्यसाची’ने मंगळसूत्राची वादग्रस्त जाहिरात हटवली

Subscribe

यंदा दिवाळी सणानिमित्त ‘सब्यासाची मुखर्जी’ या प्रसिद्ध फॅशन ब्रॅण्डने महिलांसाठी लेटेस्ट डिझायनचे मंगळसूत्र कलेक्शन लाँच केले. मात्र या मंगळसूत्राच्या जाहिरातीवरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. नेमकी ही मंगळसूत्राची जाहिरात आहे की कामसूत्राची असं म्हणत सोशल मीडियावरील युझर्स जाहिरातीवर टीका करत आहेत.

अशातच मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी या जाहिरातीविरोधात आक्रमक भूमिका घेत ‘सब्यसाची’ला ही जाहिरात २४ तासांत न हटवल्यास एफआयआर दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला होता. यानंतर ‘सब्यसाची’ने मंगळसूत्राची जाहिरात मागे घेतली आहे. तसेच हिंमत असेल तर अशी जाहिरात इतर कोणत्याही धर्मावर करु दाखवा असे आव्हानही मंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी दिले आहे. या इशाऱ्यानंतर ‘सब्यसाची’ने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली. यात त्यांनी जाहिरातीमुळे समाजातील एक घटक दुखावला गेल्याचे आम्हाला दु:ख आहे, असे म्हणत आम्ही ही जाहिरात हटवत आहोत. असे जाहीर केले.

- Advertisement -

‘सब्यसाची’ने चार दिवसांपूर्वी ज्वेलरी कलेक्शन सेट लाँच केला होता. या संग्रहाला त्यांनी ‘द रॉयल बेंगाल टायगर आयकॉन’ असे नाव दिले आहे. या सेटमधील मंगळसूत्रावर केलेल्या जाहिरातीवरून वाद निर्माण झाला आहे. कंपनीने या मंगळसूत्राला ‘द रॉयल बंगाल मंगळसूत्र 1.2’ असे नाव दिले आहे. या जाहिरातीत एक महिला आणि पुरुषाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. जाहिरातीत महिलेने काळ्या रंगाचा इंटिमेट ड्रेससह मंगळसूत्र परिधान केले आहे. ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होताच युजर्सने वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करण्यास सुरुवात केली. अनेक युजर्सनी ही मंगळसूत्राची जाहिरात असल्याचे कोणत्या अँगलमधून दिसतेय? असा सवाल उपस्थित केलाय. या जाहिरातीतील महिला मॉडेलचे नाव वर्षिता तटावर्ती आणि पुरुष मॉडेलचे नाव प्रतीक जैन असं आहे.

‘सब्यसाची’च्या या वादग्रस्त जाहिरातीला हिंदू संघटनांकडूनही विरोध सुरु आहे. तर सर्वसामान्यांमध्येही या जाहिरातीबद्दल संताप व्यक्त होत आहे. हिंदू सण आला की लोकांची सर्जनशीलता का बाहेर येते? असा सवाल अनेकांनी केलाय. तर या जाहिरातीमुळे हिंदू रूढी-प्रथांवर हल्ला झाल्याचे अनेक हिंदू संघटनांचे म्हणणे आहे. लग्नासारख्या पवित्र नात्यालाही या कंपन्या बिघडवण्याचा आणि कलंकित करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका होत आहे.

- Advertisement -

गृहमंत्री मिश्रा यांचा युक्तिवाद

या जाहिरातीवर गृहमंत्री मिश्रा म्हणाले की, डिझायनर मुखर्जी यांची मंगळसूत्राची जाहिरात अत्यंत आक्षेपार्ह आहे. धार्मिक दृष्टिकोनातून मंगळसूत्रला महत्त्व आहे. सर्व दागिन्यांमध्ये मंगळसूत्र सर्वोत्तम आहे. मंगळसूत्राचा पिवळा भाग माता पार्वती आणि काळा भाग भगवान शिव आहे असे मानले जाते. शिवाच्या कृपेने स्त्री आणि तिचा पती यांचे रक्षण होते. माँ पार्वतीच्या कृपेने वैवाहिक जीवन सुखी राहते. तुमच्यात हिंमत असेल तर इतर कोणत्याही धर्मावर अशा प्रकारची जाहिरात करुन दाखवा, असे आव्हान त्यांनी फॅशन ब्रँडला केलेय. तसेच सर्व इशाऱ्यांना न जुमानता हिंदू धर्म आणि त्याच्या प्रतीकांशी छेडछाड सुरूच आहे, जी खपवून घेतली जाणार नाही, यावर माझा तीव्र आक्षेप आहे अशा शब्दात गृहमंत्री मिश्रा यांनी विरोध दर्शवला.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -