Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश मोदी सरकारचे इंडिया हटाव! जी-२० डिनर कार्डवर लिहिले प्रेसिडेंट ऑफ भारत

मोदी सरकारचे इंडिया हटाव! जी-२० डिनर कार्डवर लिहिले प्रेसिडेंट ऑफ भारत

Subscribe

काँग्रेससह विरोधकांकडून जोरदार आगपाखड

दिल्लीतील प्रगती मैदानावर ९ ते १० सप्टेंबर दरम्यान जी-२० शिखर परिषद होत आहे. या परिषदेत सहभागी होणार्‍या जागतिक नेत्यांसाठी राष्ट्रपती भवनात ९ सप्टेंबर रोजी डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या वतीने देण्यात येणार्‍या डिनरला उपस्थित राहण्यासाठी पाहुण्यांना राष्ट्रपती भवनातून निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे.

या निमंत्रण पत्रिकेत परंपरेला बगल देत ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असे लिहिण्यात आले आहे. यावरून नव्या वादाला खतपाणी मिळाले आहे. विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीला इंडिया असे नाव दिल्यानेच इंडिया नाव हटवण्यात आल्याची आगपाखड विरोधकांकडून होत आहे, तर भारत हा शब्द आपल्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचे, सांस्कृतिक संपत्तीचे, सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असल्याचे दाखले सत्ताधारी भाजपकडून देण्यात येत आहेत.

- Advertisement -

शुक्रवारी गुवाहाटी येथे सकल जैन समाजाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशाला इंडिया नव्हे तर भारत म्हणावे, असे आवाहन केले होते. शतकानुशतके आपल्या देशाचे नाव भारत आहे, इंडिया नाही. त्यामुळे आपण जगात कुठेही गेलो तरी देशाचे नाव सर्वत्र भारतच राहिले पाहिजे, जेव्हा आपण ते म्हणू, ऐकू आणि लिहू. तेव्हा ते लोकांना कळेल. कोणाला ते समजले नाही, तर त्याची अजिबात काळजी करू नका. समोरच्याला समजून घ्यायचे असेल, तर तो स्वतःच समजून घेईल. आज जगाला आपली गरज आहे. आपण जगाशिवाय जगू शकतो, पण जग आपल्याशिवाय जगू शकत नाही, असेही भागवत म्हणाले होते.

विशेष अधिवेशनात काय?
१८ ते २२ सप्टेंबर दरम्यान होणार्‍या संसदेच्या विशेष अधिवेशनात मोदी सरकार वन नेशन, वन इलेक्शनसोबत इंडिया हे नाव हटवण्याचा प्रस्ताव आणू शकते, अशा चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीने सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसच्या संसदीय गटाची बैठक सोनिया गांधी यांच्या १० जनपथ येथील निवासस्थानी झाली. या बैठकीतून बाहेर आल्यावर काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, सरकारने विशेष अधिवेशाचा मुद्दा आम्हाला सांगितलेला नाही. सामाजिक समस्या, आर्थिक समस्या, परराष्ट्र धोरण या विषयांवर चर्चा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. आम्ही फक्त मोदी चालीसासाठी बसणार नाही.

- Advertisement -

इंडिया नाव कसे हटवणार?
संविधानातील अनुच्छेद क्रमांक १ इंडिया आणि भारत या दोन्ही नावांना संमती देणारे आहे. जर केंद्र सरकारला इंडिया नाव हटवायचे असेल, तर त्यासाठी अनुच्छेद १ मध्ये घटना दुरुस्तीचा प्रस्ताव आणावा लागेल. तो मंजूर करून संसदेत विधेयक आणावे लागेल. हे विधेयक दोन तृतीयांश बहुमताने मंजूर करून घ्यावे लागेल.

काँग्रेसला देशाच्या सन्मानाशी संबंधित प्रत्येक गोष्टीची अडचण का असते? भारत जोडोच्या नावावर राजकीय यात्रा करणार्‍यांना भारत माता की जयच्या घोषणेमुळे इतका संताप का येतो? हे स्पष्ट आहे की काँग्रेसच्या मनात ना देशाबद्दल सन्मान आहे, ना देशाच्या राज्यघटनेबद्दल. त्यांना फक्त एका कुटुंबाचा कौतुकसोहळा करण्यामध्ये रस आहे.
-जे. पी. नड्डा, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप

राज्यघटनेच्या कलम १ मध्ये भारत, म्हणजेच इंडिया हा राज्यांचा संघ असेल, असे लिहिले आहे, पण आता या माध्यमातून संघराज्यांवरही हल्ला होत आहे. मोदी इतिहासाचे विकृतीकरण करून भारताचे विभाजन करण्याचे काम सुरू ठेवू शकतात. शेवटी, भारतीय पक्षांचे उद्दिष्ट काय आहे? हा भारत आहे – सौहार्द, सलोखा आणि विश्वास आणणारा.
-जयराम रमेश, राष्ट्रीय सचिव, काँग्रेस

- Advertisment -