मुंबई : ‘हूल’ आणि ‘भूल’ ही सध्याच्या राज्यकर्त्यांची प्रमुख शस्त्रे आहेत. त्यांचा वापर करीत जनतेला एका वेगळ्याच भुलभुलैयात ठेवण्याचा उद्योग नऊ वर्षांपासून सुरू आहे. 2024साठीही त्यांचा तोच प्रयत्न आहे. मात्र या नऊ वर्षांच्या सत्तेने आपल्याला फक्त ‘कळा’च दिल्या, हे आता जनतेला समजले आहे. त्यामुळे 2024मध्ये देशात परिवर्तन घडवून आणायचेच, असा निश्चय जनतेने मनाशी केलाच आहे. ‘गणराया, देशात वाढलेला दंभ आणि सुंभ, जनतेची इडापीडा नष्ट कर आणि लोकशाहीवरील विघ्न दूर कर!’ अशीच प्रार्थना तमाम गणेशभक्तदेखील आज घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पांच्या चरणी करीत असतील, असा निशाणा ठाकरे गटाने साधला आहे.
हेही वाचा – ‘असा’ असेल नवीन संसद भवनाचा पहिला दिवस, जाणून घ्या कामकाजाचे संपूर्ण वेळापत्रक
विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची वज्रमूठ 2024मध्ये आपला सफाया करणार याची जाणीव झालेले राज्यकर्ते आणि त्यांचे भक्त यांना ‘इंडिया नव्हे भारत’ची उचकी लागली आहे. ‘चांद्रयान-3’ मोहिमेपासून ‘जी-20’ परिषदेपर्यंत तथाकथित जागतिक यशाचा ‘क्लोरोफॉर्म’ जनतेला देण्याचे उद्योग होत आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात करण्यात आली आहे.
महागाई, बेरोजगारी आणि इतर संकटांनी गांगरलेल्या देशवासीयांना धर्म आणि श्रद्धेच्या गुंगीत गुंतविण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यासाठी अयोध्येतील श्रीराम मंदिरापासून समान नागरी कायदा, ‘एक देश – एक निवडणूक’ अशा अनेक गोष्टींची ‘हूल’ दिली जात आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
हेही वाचा – आदित्य-L1 मिशन: सूर्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे; पृथ्वीच्या कक्षेबाहेर पडलं आदित्य-L1
महागाईपासून बेरोजगारीपर्यंत, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यापासून रोजगारनिर्मितीपर्यंत, धर्मापासून विकासापर्यंत, देशाच्या संरक्षणापासून तथाकथित आत्मनिर्भरतेपर्यंत फक्त डंका आणि बोभाट्याचे फुगे हवेत सोडले जात आहेत. राज्याराज्यांत जातीय, धार्मिक ध्रुवीकरणाचे उद्योग सुरू आहेत. त्यातून दंगली पेटवून त्यावर राजकीय स्वार्थाच्या पोळ्या भाजण्याचे सत्तापक्षाचे इरादे आहेत, असे शरसंधानही ठाकरे गटाने केले आहे.
कितीही संकटे असली, प्रतिकूल परिस्थिती असली तरी गणपती बाप्पांचे आगमन आणि त्यांना दिला जाणारा निरोप धूमधडाक्यातच पार पडतो. यंदा कोरोनाचे सावट दूर झाले आहे. तथापि, त्याची जागा इतर अनेक संकटांनी घेतली आहे. देशासमोरील आव्हाने वाढतच आहेत आणि सर्वसामान्य जनतेवरील संकटांमध्येही दिवसागणिक भर पडत आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.