Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो?

भारतात दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आज भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. मात्र स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन दिवसांमधील फरक अनेकांना आजही विस्तृतपणे सांगता येत नाही. भारताचा एक नागरिक म्हणून प्रत्येकाला प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो याची माहिती असणे आवश्यक आहे.

प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो?
15 ऑगस्ट 1947 रोजी देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यामुळे हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी 1930 साली लाहोरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरु यांनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. याच अधिवेशनात तिरंगा ध्वजही फडकवण्यात आला. या दिवसाची आठवण म्हणून राज्यघटना अंमलत आणण्याचे निश्चित करण्यात आले.

RepublicDay | देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन! जाणून घ्या इतिहास

स्वातंत्र्यानंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम तब्बल 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस सुरु होते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संविधान समितीने राज्यघटनेचा मसुदा तयार केला. हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वीकृत करण्यात आले. देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला असला तरी 26 जानेवारीपासून भारताचं लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरु झाले. भारत या दिवसापासून लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनला. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

 


हेही वाचा :

सर्वोच्च न्यायालयाचे निकाल उपलब्ध होणार चार भाषांमध्ये, सरन्यायाधीशांनी दिली माहिती