घरदेश-विदेशऐतिहासिक! भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान! अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे आव्हान

ऐतिहासिक! भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान! अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे आव्हान

Subscribe

लंडन : भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. ते ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान बनले आहेत. हुजूर पक्षाचे नेते ऋषी सुनक यांचे नाव जाहीर झाल्याने तमाम भारतीयांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला आहे. तथापि, ब्रिटनची घसरलेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याचे आव्हान सुनक यांच्यासमोर असेल.

जुलै महिन्यात ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील 4 मंत्र्यासह 40 जणांनी राजीनामे दिल्याने ते सरकार कोसळले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ऋषी सुनक यांचा पराभव करून लिझ ट्रस विजयी झाल्या होत्या. पण अवघ्या 45 दिवसांतच त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यांनी 6 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली आणि 45 दिवसांत राजीनामा दिल्यामुळे ब्रिटनच्या इतिहासातील त्या सर्वात कमी कार्यकाळ असलेल्या पंतप्रधान बनल्या.

- Advertisement -

पंतप्रधानपदाच्या प्रचारादरम्यान अर्थव्यवस्था रुळावर आणण्याबाबत लिझ ट्रस यांनी आश्वासने दिली होती. नेमकी तीच त्यांच्या अडचणीची ठरली. महागाई नियंत्रणात आणण्यात ट्रस सरकार पूर्णपणे अपयशी ठरले. ट्रस यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करणारे अर्थमंत्री क्वासी क्वार्टेंग यांना राजीनामा द्यावा लागला होता. तर, लिझ ट्रस यांना करकपातीसंदर्भातील आपली सर्व धोरणे मागे घ्यावी लागली होती. या धोरणांचा फटका अर्थव्यवस्थेला बसला होता. राजकीय संकटही अधिक गहिरे झाले होेते. ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा निवडणूक घेण्यात आली.

- Advertisement -

माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काल पंतप्रधानपदाच्या रेसमधून माघार घेतली होती. तेव्हाच ब्रिटनचे अर्थमंत्री राहिलेल्या ऋषी सुनक यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यांच्यासमोर पेनी मॉर्डंट यांचे आव्हान होते. पण पेनी मॉर्डंट यांनीही माघार घेतल्याने ऋषी सुनक नवे पंतप्रधान झाले आहेत. सुनक यांना 145पेक्षा जास्त खासदारांचे समर्थन मिळाले.

अर्थव्यवस्थेचे आव्हान
ब्रिटनची अर्थव्यवस्था सध्या घसरली आहे. त्यामुळे महागाईच्या झळा तिथे वाढत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून तेथील राजकीय परिस्थिती देखील अस्थिर झाली आहे. गेल्या चार महिन्यांतच दोन पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आर्थिक घडी पुन्हा बसवून ब्रिटनला प्रगतीपथावर आणण्याचे महत्त्वाचे कार्य सुनक यांना करायचे आहे.

कोण आहेत ऋषि सुनक

ऋषि सुनक हे इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. यॉर्कशायर रिचमंड येथून ते खासदार आहेत. 2015मध्ये संसदेत पाऊल ठेवणारे ऋषि हे हुजूर पक्षाच्या नेत्यांपैकी एक होते, ज्यांनी बोरिस जॉन्सन यांच्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. ब्रेक्झिटमधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनमधील छोटे व्यवसाय अधिक चांगली कामगिरी करतील, असा त्यांचा विश्वास होता. अर्थमंत्री होण्यापूर्वी सुनक हे राजकोषागाराचे मुख्य सचिव आणि अर्थमंत्र्यांचे सेकंड-इन-कमांडही होते.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -