धुक्यानं घेतला चीनमधील 17 जणांचा जीव

चीनमध्ये धुक्यामुळे समोरील काही न दिसल्याने अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत.

चीनमध्ये धुक्यामुळे समोरील काही न दिसल्याने अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत. ही घटना दक्षिणी चीनमध्ये रविवारी सकाळी घडली. (Road Accident In China Killed 17 And Many Injured Due To Dense Fog)

मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये नववर्षाचा उत्सव सुरु असून, लोक सुट्टी काढून बाहेर फिरायला जात आहेत. अशातच धुक्यांमुळे या नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. पर्यटकांची वाहने एकमेकांवर आदळली. अपघात ग्रस्त वाहनांची संख्या मोजली जात आहे. अजून प्रचंड धुके असल्याने समोरील काही दिसत नाही. जेवढे जखमी सापडत आहेत तेवढ्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले जात आहे. स्थानिक वाहतूक व्यवस्थापन ब्रिगेडने दिलेल्या माहितीनुसार जिआंगशी प्रांतातील नानचांग शहराच्या बाहेरील भागात हा अपघात झाला.

सुट्टीच्या काळात ड्रायव्हर आणि प्रवाशांची संख्या वाढते. चंद्र वर्ष हे चीनमधील कुटुंबे ही एकत्र येऊन साजरे करतात. यामुळे लाखो प्रवासी त्यांच्या गावी परततात. कोविड-19 चे बहुतेक निर्बंध हटवल्यामुळे या वर्षी 22 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आठवडाभराच्या सणासुदीच्या हंगामात मोठ्या संख्येने लोक प्रवास करतील अशी अपेक्षा आहे. त्यातच चीनचा बहुतांश भाग कोरोनाग्रस्त आहे.

कोविड-19 चे निर्बंध हटवण्यात आले असताना नवीन वर्षाच्या निमित्ताने लोक घराबाहेर पडत आहेत. नवीन वर्षाचा उत्सव पुढील एक आठवडा सुरू राहणार असून 22 जानेवारीपासून सुरू होईल. दरम्यान, अनेकदा असे अपघात ड्रायव्हरच्या थकव्यामुळे आणि खराब देखभाल केलेल्या वाहनांमुळे किंवा ओव्हरलोड वाहनांमुळे होतात. परंतु कठोर नियमांमुळे अलिकडच्या वर्षांत त्यांच्या घटना कमी झाल्या आहेत.

याआधी, डिसेंबरमध्ये चीनमधील झेंगझोऊ येथेही अशी मोठी दुर्घटना घडली होती. त्यावेळी एका पुलावर सुमारे 200 वाहने एकमेकांवर आदळली होती. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. तो अपघातही दाट धुक्यामुळे झाला होता.


हेही वाचा – ‘हवेत कोण आहे याची…’, देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर