डेहराडून : दिवाळी सणाला सुरुवात झाली असून धनत्रयोदशीला लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतात. मात्र असेही काही लोक असतात जे दिवाळीच्या सणात श्रीमंत होण्यासाठी लॉटरी, जुगार आणि सट्टा खेळतात. पण उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये दरोडेखोर अवघ्या 30 मिनिटांत श्रीमंत झाले आहेत. (Robbers became rich in 30 minutes on Dhantrayodashi Jewelery worth 20 crores was looted in dehradun)
हेही वाचा – ऐकावं ते नवलच, दोन फ्लॅट तब्बल दीडशे जणांना विकले! विरारमधील प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला काही दरोडेखोरांनी डेहराडून येथील रिलायन्स ज्वेलरी शोरूमवर हल्ला केला आणि अवघ्या 32 मिनिटांत 20 कोटींचे दागिने लुटून सहज फरार झाले. राजपूर रोडवर असलेले रिलायन्स ज्वेलरी शोरूम नेहमीप्रमाणे सकाळी 10.15 वाजता उघडले होते. शोरूमचे 11 कर्मचारी ग्राहक येण्यापूर्वी दागिन्यांची व्यवस्था करत होते. डिस्प्ले बोर्डमध्ये 20 कोटींहून अधिक किमतीचे हिरे आणि सोन्याचे दागिने होते. मात्र सकाळी 10 वाजून 24 मिनिटांनी चार मुखवटा घातलेले चोर शोरूममध्ये घुसले.
चोरांनी आधी सुरक्षा रक्षक हयात सिंग यांना शोरुममध्ये ओढले आणि त्यानंतर शोरूममधील सर्व कर्मचाऱ्यांना बंदुकीच्या धाकावर ओलिस ठेवले. यावेळी त्यांनी सर्वांचे मोबाईल ताब्यात घेतले. काही कर्मचाऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोरांनी त्यांना मारहाण केली. तसेच कर्मचाऱ्यांचे हात प्लास्टिकच्या बँडने बांधले आणि शोरूमच्या किचनमध्ये सर्वांना कोंडून ठेवले. यानंतर काही महिला कर्मचाऱ्यांना धमकावून डिस्प्ले बोर्डवर लावलेले दागिने काढून बॅगमध्ये भरण्यास भाग पाडले. यानंतर चोरांनी तीन महिला कर्मचाऱ्यांनाही किचनमध्ये बंद केले आणि 11 वाजता घटनास्थळावरून पळ काढला. धक्कादायक म्हणजे ज्या रिलायन्स ज्वेलरी शोरूममध्ये हा दरोडा पडला ते सचिवालय आणि पोलीस मुख्यालयाच्या अगदी जवळ आहे.
हेही वाचा – Mahadev App: सौरभ चंद्राकरवर आता ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल; मुंबई पोलिसांची कारवाई
मुख्यमंत्र्यांकडून तीव्र नाराजी
राजधानी डेहराडूनमध्ये झालेल्या चोरीच्या मोठ्या घटनेनंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी कठोर भूमिका घेत त्यांनी पोलीस महासंचालक अशोक कुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक एपी अंशुमन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आणि बैठकीनंतर लवकरात लवकर हे प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले.