राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर कारवाई होणार ? अध्यक्षांचे संकेत

मी रात्रभर झोपू शकलो नाही, व्यंकय्या नायडू भावूक

Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu

राज्यसभेत मंगळवारी झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडून यांनी तीव्र नापसंती दर्शवली. राज्यसभेतील सदस्यांमार्फतच्या गदारोळावर व्यंकय्या नायडू म्हणाले की, जेव्हा विरोधकांमधील सदस्य हे बाकावर बसले आणि काही जण वर चढले तेव्हा सभागृहाचे पावित्र्य नष्ट करण्यात आले. विरोधकांच्या गदारोळामुळे रात्रभर झोपू शकलो नाही, असेही व्यंकय्या नायडू यांनी भावूक होऊन सांगितले. मंगळवारी राज्यसभेत सदस्यांकडून पेगॅसस प्रकरण आणि कृषी कायद्याच्या मुद्द्यावर गोंधळ घातण्यात आला. अतिशय बेशिस्त अशा वर्तनामुळेच व्यंकय्या नायडू यांनी या संपुर्ण वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या गोंधळानंतर राज्यसभेतील कामकाज तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर कारवाईचे संकेत मिळत आहेत. राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू, सभागृहाचे नेते पियूष गोएल, भाजपचे खासदार यांच्यात आज बुधवारी सकाळी एक बैठक पार पडल्याची माहिती आहे. त्यानुसार या विरोधी पक्षातील खासदारांविरोधात कारवाईचे संकेत आहेत.

राज्यसभेत झालेल्या गोंधळाच्या वेळी काही खासदारांनी वेलमध्ये जातानाच डेस्कवर चढण्याचा प्रताप केला. तसेच नियमपुस्तिकाही फेकण्याचा प्रकार झाला. जय जवान, जय किसान या घोषणाही देण्यात आल्या. तसेच कृषी कायदे रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. विरोधी पक्षातील खासदारांच्या वागणुकीर तीव्र नाराजी व्यक्त करतानाच व्यंकय्या नायडू म्हणाले की, हे दुःख व्यक्त करण्यासाठी काय करावे मला कळाले नाही कारण मी रात्रभर झोपलो नाही. हे सगळे घडण्यामागे नेमके काय होते हे मला समजत नाही असेही ते म्हणाले.

जनतेशी संबंधित प्रश्नांवर सरकार पळ काढत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. सरकार विरोधकांचा आवाज दाबत असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला. या विषयावर मंगळवारी उपसभापतींनी दोन्ही बाजूच्या उपस्थितीत खासदारांना बैठकीसाठी बोलावले. त्यानंतर दुपारी ४ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. पण त्याचवेळी उपस्थित खासदारांनी मात्र घोषणाबाजी सुरू करत वेलमध्ये जाऊन बेशिस्त वागायला सुरूवात केली. काही खासदार बाकांवर उभे राहिले. तर काही जणांनी सभापतींच्या दिशेने नियमपुस्तिका फेकण्याचा प्रताप केला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मिडियावरही व्हायरल झाले आहेत.