घरCORONA UPDATECorona: भेदभाव न करता सगळ्यांसाठी अथक प्रयत्न करावे लागतील - सरसंघचालक

Corona: भेदभाव न करता सगळ्यांसाठी अथक प्रयत्न करावे लागतील – सरसंघचालक

Subscribe

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून निवेदन सादर केलं. यावेळी त्यांनी कोरोनाचा लढा देण्यासाठी आणि हे संकट गेल्यानंतर देखील काय करायला हवं? याबाबत आपली भूमिका मांडली. ‘ कोरोनाला घाबरण्याची आवश्यकता नाही. घाबरल्यामुळे शत्रू जास्त ताकदवान होतो. आत्मविश्वासाने सुनियोजित प्रयत्न आपल्याला सातत्याने करायचे आहेत. कारण हा आजार नाही, यात नक्की काय होऊ शकतं, ते घडल्यानंतर त्याचा अंदाज लागतोय. हे किती काळ चालेल ते माहीत नाही. पण जोपर्यंत चालेल, तोपर्यंत पीडितांना मदत करण्याचे आपले प्रयत्न सुरूच ठेवावे लागतील. प्रयत्नांमध्ये आपण थकता कामा नये. प्रयत्न सगळ्यांसाठी करावे लागतील. यात कोणताही भेद नाही. जे जे यातून पीडित झाले आहेत, ते सगळे आपले आहेत. जेवढी आपली ताकद आहे, तेवढी सेवा करावी लागेल. सगळ्यांनी मिळून काम करावं लागेल. आपण आपल्या लोकांसाठी काम करत आहोत. त्यामुळे ते प्रेमाने आणि उत्तम व्हायला हवं’, असं ते म्हणाले.

या संकटाचा संधी म्हणून विचार करा!

दरम्यान, यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी कोरोनाच्या या संकटाचा संधी म्हणून विचार करण्याची भूमिका मांडली आहे. ‘कोरोनाच्या या संकटाचा संधी म्हणून विचार करून आपल्या जीवनपद्धतीमध्ये योग्य ते बदल करणं आवश्यक आहे’, असं ते म्हणाले. ‘गेल्या काही शतकांमध्ये जग पहिल्यांदा अशा संकटाचा सामना करत आहे. हे संकट काही शिकवत देखील आहे. आपल्याला स्वदेशीचा अवलंब करायला हवा. जे काही असेल, ते देशातलंच वापरू आणि जर विदेशी गरजेचंच असेल, तर त्याचा वापर कमी प्रमाणात असेल, याची काळजी आपण घ्यायला हवी. शिस्तीचं पालन करणं नितांत आवश्यकता आहे’, असं देखील ते म्हणाले.

- Advertisement -

पालघरच्या घटनेवर भाष्य…

यावेळी मोहन भागवतांनी पालघरमध्ये दोन साधूंना जमावाने गैरसमजातून निर्घृणपणे मारहाण करत मारून टाकल्याच्या घटनेचा देखील त्यांनी उल्लेख केला. ‘पालघरमध्ये संन्याशांना मारून टाकलं गेलं. त्याचं आपल्याला सगळ्यांना दु:ख आहे. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. जनसेवेसाठी काम करणाऱ्यांना जमावाने मारून टाकलं. पण आगामी काळात समाजात दुही निर्माण करणाऱ्या आणि लोकांची माथी भडकवणाऱ्यांपासून दूर राहावं लागेल’, असं ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -