चीनसह ६ देशांतील प्रवाशांना आरटी-पीसीआर बंधनकारक

केंद्राचा आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी महत्वपूर्ण निर्णय, १ जानेवारी २०२३ पासून नियम लागू होणार

चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार चीन, हाँगकाँग, सिंगापूर, थायलँड, दक्षिण कोरियासह जपान अशा ६ देशांमधून येणार्‍या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी ट्विट करीत ही माहिती दिली. १ जानेवारी २०२३ पासून हे नियम लागू होणार आहेत. भारतात प्रवेश करण्यासाठी या ६ देशांमधील प्रवाशांना प्रवासाआधीच त्यांचा ७२ तास जुना निगेटिव्ह आरटी-पीसीआरचा अहवाल एयर सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागणार आहे.

कोरोना ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट बीएफ. ७ विषाणूने चीन, जपान, हाँगकाँग, तैवान, दक्षिण कोरिया, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि ब्राझील या देशांमध्ये थैमान घातले आहे. या विषाणूच्या प्रसाराचे प्रमाण खूप जास्त आहे. या सब व्हेरियंटने संक्रमित झालेली एक व्यक्ती १६ लोकांना संक्रमित करू शकते. प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय प्रवाशांमुळे कोरोनाचा संसर्ग दुसर्‍या देशांमध्येही वाढत आहे. १५० पैकी एक प्रवासी कोरोनाने संक्रमित असल्याचे आढळत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांची रँडम चाचणी घेण्यात येत आहे.

सद्यस्थितीत तरी भारतात कोरोना नियंत्रणात आहे. तसेच ९५ टक्के लसीकरण झाल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पण काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात चढउतार पाहायला मिळत आहे. याआधीचा कोरोना संसर्ग प्रसाराचा कल पाहिल्यास पूर्व आशियापासून सुरुवात केल्यानंतर विषाणू भारतात पोहचण्यास ३० ते ३५ दिवस लागतात. त्यानुसार भारतासाठी जानेवारी महिना महत्वाचा असेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गेल्या २४ तासांत देशात २६८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अद्यापपर्यंत २,३६,९१९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. बुधवारी हाच आकडा १,३४,९९५ वर पोहचला होता.