Crude Oil Price: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम थेट भारतात, २०१४ नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किंमतीने गाठला उच्चांक

Russia-Ukraine War crude oil price touches 100 dollar per barrel afte -september 2014 petrol diesel prices hike likely
Crude Oil Price: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम थेट भारतात, २०१४ नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किंमतीने गाठला उच्चांक

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. कारण रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सैन्याला स्पेशल ऑपरेशन करणाचे आदेश दिले आहे. तसेच युक्रेनच्या सैन्याला शस्त्रे खाली ठेवून घरी जा, अन्यथा रक्तपात अटळ असा इशारा दिला आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोट झाले आहेत. बुधवारी युक्रेनने देशव्यापी आणीबाणी घोषित केली आहे. याचा मोठा परिणाम भारतासह जगावर होताना दिसत आहे. रशियाने युक्रेनमध्ये काही ठिकाणी हल्ला केल्यानंतर कच्च्या तेलाची किंमत १०१ डॉलर प्रति बॅरल अशी उच्चांकीवर पोहोचली आहे. सप्टेंबर २०१४ नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाची किंमत १०० डॉलर प्रति बॅरल झाली आहे. त्यामुळे आता देशातील नागरिकांना मोठा झटका लागणार आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा गगना भिडणार आहेत. जर रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आणखीन चिघळले तर कच्च्या तेलाच्या किंमतीत आणखीन वाढ होऊ शकते.

आंतरराष्ट्रीय रिसर्च एजेन्सींचे म्हणणे आहे की, कच्चा तेलाच्या किंमती आणखीन वाढू शकतात. Goldman Sachs म्हणाले होते की, २०२२ मध्ये कच्च्या तेलाची किंमत १०० डॉलर प्रति बॅरल होईल आणि हिच भविष्यवाणी खरी ठरली आहे. JP Morganने २०२२मध्ये १२५ प्रति डॉलर आणि २०२३ मध्ये १५० डॉल प्रति बॅरलपर्यंत कच्च्या तेलाच्या किंमती वाढतील, अशी भविष्यवाणी केली आहे.

दोन महिन्यांपासून कच्चा तेलाच्या किंमती भडकल्या

२०२२मध्ये कच्च्या तेलाची किंमत २५ टक्क्यांहून अधिक झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सलग कच्च्या तेलाच्या किंमती वेगाने वाढताना दिसत आहे. १ डिसेंबर २०२१ला कच्च्या तेलाची किंमत ६८.८७ डॉलर प्रति बॅरल होती. जे आता १०० डॉलर प्रति बॅरल झाली आहे.

…तरीही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होऊनही देशातील पेट्रोल-डिझेलचे दरात कोणतेही बदल झाले नाहीत. ४ नोव्हेंबर २०२१नंतरपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीत. दरम्यान देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत आणि १० मार्चला निकाल घोषित होणार आहे. त्यामुळे सरकारने कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होऊनही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणतेही बदल केले नाहीत, असे म्हटले जात आहे. पण निवडणुकांनंतर सरकार पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढत करेल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा – Russia-Ukraine War: पुतीन यांची Military Operationची घोषणा; युक्रेन सैन्याला दिले शस्त्र टाकण्याचे संकेत