निवडणूक आयोगाने आणला ‘रिमोट’… अशी आहे प्रणाली

आयआयटी मद्रासने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. स्थलांतरीत मजूर, कामगार, अधिकारी यांच्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. याआधी निवडणूक आयोगाने टपालद्वारे मतदान करण्याचा पर्याय दिला होता. आता आरव्हीएमचा पर्याच आयोगाने दिला आहे. हा पर्याय म्हणजे घरी बसून मतदान करता येणार नाही.

Electronic Voting Machines,
प्रातिनिधीक फोटो

नवी दिल्लीः शंभर टक्के मतदानासाठी निवडणूक आयोग नवनवीन पर्याय उपलब्ध करुन देते. त्याचाच एक भाग म्हणून निवडणूक आयोगाने रिमोट इलेक्ट्राॅनिक व्होटिंग मशीनचा (आरव्हीएम) पर्याय आणला आहे. हे मशीन ७२ मतदानसंघांना जोडणारे आहे. त्यामुळे मतदारांना देशातील कोणत्याही भागातून मतदान करता येणार आहे.

आयआयटी मद्रासने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. स्थलांतरीत मजूर, कामगार, अधिकारी यांच्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. याआधी निवडणूक आयोगाने टपालद्वारे मतदान करण्याचा पर्याय दिला होता. आता आरव्हीएमचा पर्याच आयोगाने दिला आहे. हा पर्याय म्हणजे घरी बसून मतदान करता येणार नाही. त्यासाठी जवळच्या मतदान केंद्रावर जाणे आवश्यक आहे. परराज्यातील संबंधित मतदान केंद्रावरुन आपला उमेदवार निवडता येणार आहे. सुमारे ४५ कोटी नागरिक हे स्थलांतरीत आहेत. हे नागरिक आपल्या मुळच्या पत्त्यावर राहत नाही. नोकरी, शिक्षण किंवा अन्य कामासाठी ते बाहेर असतात. अशा मतदारांसाठी हे तंत्र विकसित करण्यात आले आहे.

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी संशोधन करण्यात आले. त्यावेळी तरुण व शहरी मतदार हे मतदानाकडे पाठ फिरवत असल्याचे निर्दशनास आले. त्यांच्या कारणांचाही शोध घेण्यात आला. तरुण व शहरी मतदार हे स्थलांतरीत असल्याची बाब समोर आली. त्यामुळे मद्रास आयआयटीच्या माध्यमातून आरव्हीएमचा पर्याय विकसित करण्यात आला. या तंत्राद्वारे ७२ मतदारसंघ जोडता येणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडूण आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

१६ जानेवारी २०२३ रोजी आरव्हीएमची चाचणी केली जाणार आहे. सर्व राजकीय पक्षांना या चाचणीसाठी बोलवण्यात आले आहे. चाचणीनंतर आरव्हीएमचा वापर कधीपासून सुरु करावा यावर निर्णय घेतला जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले. मात्र या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करताना आयोगासमोर अनेक आव्हाने आहेत. आरव्हीएमद्वारे झालेल्या मतदानाची मतमोजणी, त्यातील पारदर्शकता, मतदारांचा प्रतिसाद अशा अनेक प्रश्नांचा आयोगाला अभ्यास करावा लागणार आहे. कारण टपाल मतदानाला हवा तसा प्रतिसाद मतदार देत नाहीत.