भाजपने सत्तेच्या बाजारात काश्मिरी पंडितांचे दुःख विकले, सचिन सावंतांची टीका

Sachin Sawant criticize bjp on issue of kashmiri files
भाजपने सत्तेच्या बाजारात काश्मिरी पंडितांचे दुःख विकले, सचिन सावंतांची टीका

काश्मिरमध्ये पुन्हा एकदा कश्मिरी पंडितांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. आपल्या कार्यालयात काम करत असलेल्या एका काश्मिरी पंडितावर गोळीबार झाला या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. काश्मिरी पंडितांवर हल्ले सुरु असल्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केंद्राकडे विरोधकांनी केली आहे. मोदी सरकारचे देशभर मुस्लिम द्वेष पसरविण्यासाठी भाजपाने काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराचा वापर केला आहे. काश्मिर फाईल्समधून केवळ मोदी सरकारने राजकारण केलं असल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन सचिन सावंतांनी मोदींचे काश्मिरी पंडितांवरील प्रेम आणि कळवळा हा केवळ देखावा असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे सांगितले आहे. सचिन सावंत यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, मोदी सरकारने गेली ८ वर्षे काश्मिरी पंडितांच्या दुखाग्नीवर राजकीय पोळ्या भाजल्या आणि सत्तेच्या बाजारात काश्मिरी पंडितांचे दुःख विकले हे स्पष्ट झाले आहे. राहुल भट या काश्मिरी पंडित तरुणाच्या हत्येसोबत लाखो काश्मिरी पंडितांच्या आशा आकांक्षा आणि स्वप्नांची चिताही रचली गेली आहे, असे सचिन सावंत म्हणाले आहेत.

भाजपा समर्थित व्हि पी सिंह सरकारच्या काळात काश्मिरी पंडितांचे स्थलांतर झाले. तरीही काश्मिरी पंडितांचे दुःख व कलम ३७० चे भांडवल सातत्याने भाजपा करत राहिला. २०१९ ला ३७० कलम हटवताना काश्मिरमधील दहशतवाद संपेल व पंडितांची घरवापसी होईल असे आश्वासन दिले पण दहशतवाद पूर्वीपेक्षा वाढला आहे. देशभर मुस्लिम द्वेष पसरविण्यासाठी भाजपाने काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराचा, अनुपम खेरसारख्या बिट्टूचा व अंकीत मिडियाचा वापर केला. काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे प्रमोशन पंतप्रधान स्वतः करत होते. जनभावना भडकावण्यासाठी चित्रपटात अर्धसत्य व अंगावर शहारे आणणाऱ्या हिंसेचा वापर केला गेला असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

निर्मात्यांनी ₹२५० कोटींपेक्षा जास्त कमावले पण काश्मिरी पंडितांचे हात मात्र रिक्त राहीले. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वात दहा वर्षांत ३००० पेक्षा जास्त पंडितांना नोकऱ्या दिल्या. ५९११ घरे बांधली. पण मोदी सरकारने काहीच केले नाही. उलट काश्मिरी मुस्लिमांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. स्थानिक पंडितांचे जीवन धोक्यात घातले. राहुल भटच्या सरकारी कार्यालयात झालेल्या हत्येनंतर पंडित सुरक्षिततेवरुन मोदी सरकारला जाब विचारत आहेत. तर पोलीस अश्रूधूर व लाठ्यांचा वर्षाव करत आहेत. काश्मिरी पंडितांचे डोळे उघडले. भाजपाकडून धर्मांधतेची अफूची गोळी खाल्लेल्यांचे डोळेही उघडतील असा समचार सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांचा घेतला आहे.


हेही वाचा : Delhi Fire : दिल्लीतील अग्नितांडवात २७ लोकांचा होरपळून मृत्यू, आग नियंत्रणात