जम्मू – काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी सज्जाद लोन?

सज्जाद लोन हे जम्मू - काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याची शक्यता आहे. लोन यांच्या नावाला भाजपचा देखील पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे.

sajjad loan
फोटो सौजन्य - Amar Ujala

भाजप – पीडीपीची युती तुटल्यानंतर जम्मू – काश्मीरमध्ये सध्या राज्यपाल राजवट लागू करण्यात आलेली आहे. पण आता जम्मू – काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी सज्जाद लोन विराजमन होणार असल्याची चर्चा सध्या जम्मू – काश्मीरच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. आणि विशेष बाब म्हणजे सज्जाद लोन यांच्या नावाला भाजपचा देखील पाठिंबा असल्याची चर्चा आहे. सज्जाद लोन हे फुटीरतवादी नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर चर्चेला अधिक उधाण आले आहे. सज्जाद लोन हे हुर्रियतचे नेते अब्दुल गनी लोन यांचे चिरंजीव आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सज्जाद लोन यांच्यामध्ये काय चर्चा झाली याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पंतप्रधानांची भेट झाल्यापासून सज्जाद लोन प्रचंड खूश असल्याचंही बोललं जात आहे. मोदी आणि सज्जाद यांची भेट घडवून आणण्यामागे भाजपचे महासचिव राम माधव यांचा हात असल्याचं सांगितलं जात आहे.

सज्जाद लोन हंदवाड्यातून निवडणूक लढवणार आहेत. लोन यांनी त्यांच्या पक्षाला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. काश्मीरमध्ये भाजपने १० मुस्लिम उमेदवारांना तिकिट दिलं आहे. तसेच अनेक ठिकाणी इतर उमेदवारांना भाजपनं पाठिंबा देखील दिला आहे. काश्मीरमध्ये बहुमतासाठी ४४ आमदारांची गरज आहे. ४४ या जादुई आकड्याच्या जवळपास भाजप आल्यास मुख्यमंत्री म्हणून सज्जाद लोन यांच्या नावाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यासाठी आवश्यक ती रणनीती भाजप आखत आहे.

त्यामुळे जम्मू – काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी सज्जाद लोन बसल्यास आणि त्यात देखील भाजपच्या पाठिंब्यानं तर आश्चर्य वाटायला नको.