घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटकोरोनाने केली गोची, सलूनमधल्या दुनियाभरच्या गप्पा बंद होणार!

कोरोनाने केली गोची, सलूनमधल्या दुनियाभरच्या गप्पा बंद होणार!

Subscribe

कोरोनामुळे सगळीकडे लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सर्वात जास्त जर काही अडचणीचं झालं असेल, तर ते म्हणजे डोक्यावर आपमर्जीने कसेही वाढणारे केस! एरवी दोन आठवड्याला किंवा महिन्यातून किमान एकदा तरी न्हाव्याची कात्री डोक्याला लावून घेतल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. पण या लॉकडाऊनच्या काळात सगळंच बंद असल्यामुळे लोकांना न्हाव्याकडे जायलाच मिळालं नाही. त्यामुळे सगळ्यांचा केशसंभार वाढलेला असताना लॉकडाऊन उघडल्यानंतर अशा सलूनमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, लॉकडाऊन उघडल्यानंतर सलूनमध्ये कशा पद्धतीने नियम पाळावे लागतील हे समोर आलं असून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे तो न्हाव्यासोबत होणाऱ्या गप्पांचा!

..आरशात बघून बोलावं लागणार!

सलूनमध्ये न्हावी केस कापत असताना त्याच्या गप्पा हा मोठा इंटरेस्टिंग विषय असतो. मात्र, आता जगभरातल्या ज्या देशांमध्ये लॉकडाऊन उठवण्यात आला आहे किंवा शिथिल करण्यात आला आहे, अशा देशांमध्ये सलूनसाठी नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा नियम सलूनमध्ये मारल्या जाणाऱ्या गप्पांबाबत घेण्यात आला आहे. सलूनमध्ये केस कापताना गप्पा मारायच्या नाहीत, असं सांगण्यात आलं आहे. जर्मनीमध्ये हा निर्णय सर्वात आधी लागू करण्यात आला. २३ मार्चला लॉकडाऊन लागू झाल्यानंतर पहिल्यांदा सलून उघडले गेले. त्यानंतर हे नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांनुसार, केस कापताना ज्या दुनियाभरच्या चर्चा होतात, त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता सलूनमध्ये समोरासमोर गप्पा होणार नाही. केस कापण्यासंदर्भात जे काही बोलायचं आहे, ते समोर आरशात बघून बोलावं लागणार आहे. त्याशिवाय, सलूनमध्ये येणाऱ्यांमध्ये दीड मीटरचं अंतर ठेवावं लागणार आहे.

- Advertisement -

जगभरात सलूनवर निर्बंध लागू!

बर्लिनमध्ये नेहमीच्या ग्राहकांपेक्षा ५० टक्केच ग्राहकांना परवानगी देण्यात आली आहे. सलूनमधल्या सर्व वस्तू सॅनिटाईझ कराव्या लागत आहेत. ग्राहकांमध्ये योग्य ते अंतर ठेवावं लागणार आहे. जर्मनीमध्ये प्रत्येक ग्राहकाचं नाव आणि फोननंबर नोंद करून ठेवणं सक्तीचं केलं आहे. जेणेकरून भविष्यात ट्रेस करण्यासाठी सोपं होईल. स्पेनमध्ये ४ मेपासून सलून उघडण्यात आले आहेत. मात्र, तिथे ३० टक्केच ग्राहकांना घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या सगळ्या नियमांपेक्षाही केस कापताना गप्पा मारण्यावर आलेले निर्बंध न्हाव्यासाठीही आणि ग्राहकांसाठीही ‘अन्यायकारक’ असेच ठरू शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -