मुंबई : तामीळनाडूचे एक मंत्री उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माविषयी तोडलेले तारे अज्ञानाच्या अंधारात लुप्त झाले आहेत. महाराष्ट्राची संतपरंपरा ही सनातनी असली तरी, सामाजिक सुधारणा स्वीकारणारी होती. जगातील कोणताही धर्म निर्दोष नाही. प्रत्येक धर्मात पाखंडाचा अंश आहे. भाजपचे हिंदुत्व जसे ढोंगी तसे ढोंग सर्वच धर्मांत आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.
हेही वाचा – मानव केंद्रित जागतिकीकरण : शेवटच्या घटकापर्यंत जी-20 नेताना, कोणालाही मागे राहू देणार नाही – नरेंद्र मोदी
बाबा आमटे यांनी जातपात न पाहता कुष्ठरोग्यांना नवे जीवन दिले. जगात असे उदाहरण नसेल. जातीयता, आर्थिक भेदभाव व अस्पृश्यता या चिडीतून दक्षिणेत सनातनविरोधात ठिणगी पडली. तशी ती वारंवार महाराष्ट्रातही पडली. वीर सावरकर हे प्रखर हिंदुत्ववादी, पण त्यांचा दृष्टिकोन विज्ञानवादी होता. सनातन धर्म गाईला देवता-माता मानतो. वीर सावरकरांना गोमातेचे थोतांड मान्य नाही. बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट, पण त्यांनीही स्पष्टच सांगितले, शेंडी-जानव्याचे, घंटा बडवणाऱ्यांचे हिंदुत्व आपल्याला मान्य नाही. याउलट भाजपाचे आहे. ते निवडणुकीत राम-बजरंग बली आणतात व लोकसभेत राजेशाहीचे प्रतीक म्हणून ‘सेंगोल’ आणतात. हे विज्ञान नसून रूढीवाद आणि हुकूमशाही आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात करण्यात आली आहे.
हेही वाचा – मानव केंद्रित जागतिकीकरण : शेवटच्या घटकापर्यंत जी-20 नेताना, कोणालाही मागे राहू देणार नाही – नरेंद्र मोदी
महाराष्ट्रात डॉ. आंबेडकरांच्या चळवळीस उच्च वर्णीयांचा सक्रिय पाठिंबा होताच. महाडच्या चवदार तळ्याचा संघर्ष करण्यामागे सुरबा नाना टिपणीस होते. आगरकर, फुले, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, जोतिबा फुले, गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांच्या चरित्रांचे पारायण उदयनिधींनी करायला हवे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
समाजाला जुन्याच परंपरांत व जोखडात अडकवणारा ‘सनातनी’ विचार नव्या पिढीस मान्य नाही. धर्म तसाच राहील. जुनाट परंपरा, रूढी, विषमतेची जळमटे गळून पडतील. उदयनिधी स्टालिन, रशियात लेनीन आणि स्टॅलिनचा विचारही टिकला नाही. त्यांचे पुतळे लोकांनी तोडले, पण हिंदुस्थानात सनातन धर्म आहे आणि राहील, असा विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.